‘गोकुळ’साठी विरोधी आघाडीला स्थानिक राजकारण ठरत आहे ‘डोकेदुखी’

0
3226

कोल्हापूर (विशेष प्रतिनिधी) : गोकुळ निवडणुकीसाठी महाविकास आघाडीने सत्ताधाऱ्यांच्या विरोधात जम्बो आघाडी केलीय. पण स्थानिक राजकारण यामध्ये अडचणीचे ठरत असल्याने आघाडीमध्ये फूट पडण्याचे प्रकार होऊ लागले आहेत. त्यामुळे गोकुळ ताब्यात घेत असताना महाविकास आघाडीला स्थानिक राजकारणाचे तिढे सोडवूनच पुढे पाऊल टाकावे लागणार आहे. तर याचा फायदा सत्ताधारी गटाला जास्त होण्याची शक्यता नाकारता येणार नाही.

कोणत्याही परिस्थितीत गोकुळवर ताबा मिळवायचा म्हणून पालकमंत्री सतेज पाटील यांनी जिह्यातील सर्व राजकीय ताकत एकवटली आहे. त्यांना मंत्री हसन मुश्रीफ आणि राजेंद्र पाटील यड्रावकर तसेच बाकी नेत्यांनीही साथ दिलीय. सत्ताधारी बाजूला महादेवराव महाडिक, अरूण नरके आणि आमदार पी.एन. पाटील हेच राहिले होते. विरोधी आघाडीमध्ये सर्व पक्षाचे राजकीय नेते एकवटले खरे पण स्थानिक राजकारण विरोधी आघाडीची डोकेदुखी ठरत आहे. याच पाहिलं उदाहरण म्हणजे शाहुवाडीतून माजी आमदार सत्यजीत पाटील सरुडकर यांनी आमदार विनय कोरे यांच्या समावेशामुळे महाविकास आघाडीला या निवडणुकीत अर्ध्यावरती सोडले.

आता राधानगरी विधानसभा मतदारसंघातही हीच अडचण आलीय राष्ट्रवादीचे माजी आमदार के. पी. पाटील, ए. वाय. पाटील आणि अरुण डोंगळे यांच्यामुळे आमदार प्रकाश आबिटकर गटही अस्वस्थ झाला आहे. आपल्या विरोधकांच्या मांडीला मांडी लावून का बसायचे अशी भावना स्थानिक कार्यकर्त्यांची झाली आहे. यामुळे आ. आबिटकर यांनाही निर्णय घेणे जड जात आहे. अशीच बाब चंदगडमध्ये आमदार राजेश पाटील यांची झाली आहे. गोपाळराव पाटील यांनी केलेला काँग्रेस प्रवेश त्यांच्या मनाला लागला आहे.

एकीकडे स्थानिक राजकारण विरोधी आघाडीला अडचणीचे ठरत असताना करवीरचे माजी आमदार चंद्रदीप नरके हे मात्र आमदार पी. एन. पाटील यांच्या विरोधात ठाम राहतील. यासाठी त्यांनी गेली पाच वर्षे गोकुळमध्ये संघर्ष केलाय आणि आता निवडणुकीच्या तोंडावर आपले चुलते अरुण नरके यांच्या विरोधात त्यांनी भूमिका घेतली आहे. एकंदर सर्व परिस्थिती पाहता महाविकास आघाडीला भविष्यातील स्थानिक राजकारण अडचणीचे ठरत असल्याचे दिसून येत आहे. भविष्यात जर महाविकास आघाडी विधानसभेला वेग-वेगळी लढली तर सर्वच आजी-माजी आमदारांना आपला गट शाबूत ठेवणे क्रमप्राप्त आहे. तसेही गोकुळसाठी पक्षीय दबाव आला तरी कार्यकर्त्यांना दुखावणे नेत्यांना भविष्याच्या दृष्टीने परवडणार नाही. त्यामुळे स्थानिक राजकारण हे विरोधी आघाडीलाच जास्त डोकेदुखी ठरणार असेच चित्र सध्यातरी दिसून येत आहे.