नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : माजी केंद्रीय मंत्री यशवंत सिन्हा यांची आगामी राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी विरोधी पक्षाचे संयुक्त उमेदवार म्हणून निवड करण्यात आली आहे. सिन्हा हे २७ जून रोजी सकाळी ११.३० वाजता उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.

टीएमसी नेते सिन्हा म्हणाले, पक्षीय राजकारणापासून दूर जाण्याची आणि राष्ट्रहितासाठी काम करण्याची वेळ आली आहे. टीएमसीने सर्वोच्च पदासाठी विरोधी पक्षाचे उमेदवार म्हणून त्यांचे नाव प्रस्तावित करण्याचा निर्णय घेतल्यानंतर लगेचच हा निर्णय घेण्यात आला. ‘ममताजींनी मला टीएमसीमध्ये जो सन्मान आणि प्रतिष्ठा दिली त्याबद्दल मी त्यांचा ऋणी आहे.’ आता अशी वेळ आली आहे की, एका मोठ्या राष्ट्रीय कारणासाठी मला पक्ष सोडून अधिक विरोधी ऐक्यासाठी काम करावे लागणार आहे. मला खात्री आहे की, त्यांनी माझे टाकलेले हे पाऊल मान्य केले आहे,’ असे ट्विट सिन्हा यांनी केले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी बोलावलेल्या विरोधकांच्या बैठकीत विरोधकांनी सिन्हा यांच्या नावावर सहमती दर्शवली आहे. या बैठकीला काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, टीएमसी, सीपीआय, सीपीआय-एम, समाजवादी पार्टी, नॅशनल कॉन्फरन्स, एआयएमआयएम, आरजेडी आणि एआययूडीएफ या पक्षांचे सदस्य उपस्थित होते.

सर्व पुरोगामी विरोधी पक्षांनी पाठिंबा दिल्यानंतर यशवंत सिन्हा यांचे नाव सर्वसहमतीने जाहीर झाल्याबद्दल मी त्यांचे अभिनंदन करते. एक महान आणि कुशाग्र माणूस, जो आपल्या महान राष्ट्राचे प्रतिनिधित्व करणाऱ्या मूल्यांचे नक्कीच पालन करेल, असे ट्विट करत ममता बॅनर्जी यांनी सिन्हांचे अभिनंदन केले आहे.