कोल्हापूर (प्रतिनिधी) : छ. राजाराम सहकारी साखर कारखान्याच्या विद्यमान संचालक मंडळाच्या कारभारावर सभासद खुश आहेत. कारखान्याकडून सुरू करण्यात आलेल्या विविध योजना आणि अनुदानांचे लाभ घेणाऱ्यांची संख्या वाढते आहे. ही वाढती संख्या म्हणजेच कारखान्यावर आणि पर्यायाने व्यवस्थापनावरचा सभासदांचा वाढता विश्वास आहे. त्यामुळे विरोधी आघाडीला समोरची निवडणूक अवघड वाटत असलेने त्यांच्या पायाखालची माती सरकलेली आहे. असे पत्रक कारखान्याचे संचालक दिलीप उलपे यांनी काढले आहे.

पत्रकात म्हंटले आहे की, विरोधकांनी वैफल्यग्रस्त मानसिकतेतून एक पत्रक छापून लोकांमध्ये वाटायला सुरुवात केली आहे. पण त्यांचे नेते मागच्या निवडणुकीत म्हणाले होते, यावेळेस पॅनल आलं नाही तर पुन्हा संधी नाही.’ एवढं बोलूनही सभासदांनी त्यांना नाकारलं. मग आता त्या घोषणेच पुढे काय ? असा सवाल केला.

विरोधक म्हणत आहेत भ्रष्टाचाराचा जाब विचारू पण एवढा त्यांना अचानक साक्षात्कार कसा काय झाला आहे ?. फुकटच्या तोंडी गप्पा कशासाठी ? भ्रष्टाचार केलाय हे त्यांनी सिद्ध करून दाखवावं. आम्ही कधीही आरोपांना उत्तर देण्यास आणि कोणत्याही चौकशीला सामोरे जायला तयार आहोत. आज छ.राजाराम साखर कारखाना हा खाजगीकरणातून सहकारीकरण झालेला एक आदर्श मानदंड म्हणून कार्यरत आहे.

छ. राजाराम कारखान्याकडून सभासदांसाठी निरनिराळ्या योजना सातत्याने चालू असतात. कारखान्याकडून यापूर्वी सभासद शेतकऱ्यांना बी बियाणे, तणनाशके, किटकनाशके, बोअरवेल खुदाई, ठिबक सिंचनसाठी अनुदान देणेत आलेले आहे. इतकेच नव्हे तर यापूर्वी शेकडो शेतकऱ्यांसाठी कृषी महाविद्यालयामध्ये क्षेत्रभेटीचा उपक्रम देखील कारखान्याने राबविला होता. तेव्हा कुठली निवडणूक होती ?.  पण विरोधकांनी राजकारणासाठी कारखान्याच्या गाडीअड्ड्याच्या जमिनीवर आरक्षण टाकून कारखान्याला पर्यायाने सभासदांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न  केला होता. आणि आजही सभासदांच्या लाभदायक योजनांना विरोध करून ते सभासदविरोधी भूमिका घेत आहेत. हे कारखान्याचा स्वाभिमानी सभासद पुर्णत: जाणून आहे.

याच विरोधक व त्यांच्या बगलबच्चांनी शेतकरी संघ मोडला, बाजार समितीचं वाटोळं केलं, सप्तगंगा कारखान्यातून सहकार संपवला आणि आता या लोकांनी राजाराम कारखान्यावर बोलणे म्हणजे ‘सौ चुहे खाके बिल्ली चली हज को’ अशातला प्रकार आहे. तोंडाला येईल तसे आरोप करून, अपप्रचार करून या कारखान्याच्या पावित्र्याला आणि सभासदांच्या हक्काला कोणीच धक्का लावू शकत नाही.

सभासद शेतकऱ्यांच्या सेवेसाठी इथे सत्तारूढ आघाडीच पुन्हा विजयी होईल. कारण राजर्षी छ. शाहू महाराज यांच्या लोकोत्तर विचारातून आणि छ.राजाराम महाराजांच्या प्रेरणेने स्थापन झालेल्या या कारखान्याच्या स्वाभिमानी सभासदांनी सूर्याजी पिसाळाच्या प्रवृत्तीला याआधी कधी ही थारा दिलेला नाही आणि इथून पुढेही देणार नाहीत ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे.