कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोरोनाच्या विषाणूच्या ओमीक्रॉन व्हेरियंटच्या पार्श्वभूमीवर  यापुढे कर्नाटकासह इतर राज्यातून महाराष्ट्रात येणाऱ्या प्रवाशांना कोरोना प्रतिबंध  लसीकरण केलेले प्रमाणपत्र किंवा आरटीपीसीआर अहवाल निगेटिव्ह असल्याचे प्रमाणपत्र बंधनकारक करण्यात आले आहे. तर पर जिल्ह्यातून कोल्हापुरात येणाऱ्यांच्या तपासणीसाठी ठिकठिकाणी चेक पोस्ट नाके उभारण्यात येणार आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी आज (मंगळवार) पत्रकार परिषदेत दिली.  

जिल्हाधिकारी म्हणाले की, मास्क नसणाऱ्या आणि लस न घेणाऱ्या नागरिकांना कोल्हापुरात प्रवेश देण्यात येणार नाही. ही मोहीम आता कडक करण्यात येणार आहे. यापुढे कोणत्याही सार्वजनिक कार्यक्रमांसाठी आणि प्रवासासाठी लसीचे दोन्ही डोस घेणे बंधनकारक असेल. त्याचबरोबर दुकानामध्ये खरेदी करताना लसीचे दोन्ही डोस घेणे गरजेचे करण्यात येणार आहे. लसीचा दुसरा डोस घेऊन किमान चौदा दिवसांचा अवधी झाला पाहिजे. त्यामुळे नागरिकांनी लवकरात लवकर लसीकरण पूर्ण करून घ्यावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले आहे. १ ते ४ थी पर्यंतच्या  शाळा १ डिसेंबरपासून सुरू होत आहेत. यासंदर्भात राज्य शासनाकडून ज्या सूचना  येतील. त्यानुसार निर्णय घेण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.