कोल्हापूर (प्रतिनिधी) : जलयुक्त शिवारामधून झालेल्या कामांमुळे टंचाईग्रस्त गावांतील ट्रँकरच्या फेऱ्या कमी झाल्या आहेत. भूगर्भातील पाण्याची पातळी वाढली आहे. या कामात प्रचंड लोकसहभाग घेण्यात आला आहे. म्हणून कॅगच्या अहवालाचा आधार घेत या कामांची चौकशी करण्याचा निर्णय सरकारने केवळ राजकीय सुडापोटी घेतला आहे, असा आरोप भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला.

येथील कै. भालचंद्र चिकोडे ग्रंथालयातील पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ते म्हणाले, जलयुक्त शिवार योजनेतून झालेल्या एकूण कामांपैकी फक्त ०.१७ टक्के कामांची पाहणी कॅगने करून निष्कर्ष काढला आहे. यावर कामांची चौकशी करणार असल्याचे सरकार सांगत आहे. चौकशी करण्यास आमची काही हरकत नाही. जिल्हाधिकाऱ्यांतर्फे झालेल्या कामांची यादी घेऊन चौकशी करा, दोषींवर कारवाई करा. पण या कामांमुळे फायदाच अधिक झाला आहे. चुकीचे काहीही झालेले नाही, असे आमचे म्हणणे आहे. म्हणून केवळ राजकीय आकसापोटी चौकशी करणे चुकीचे आहे.

शाळा कधी सुरू करायचे याबद्दल मंत्र्यांमध्ये एकवाक्यता नाही. यामुळे वेगवेगळ्या तारखा जाहीर करून विद्यार्थी, पालकांमध्ये संभ्रम निर्माण केला जात आहे. याऐवजी सरकारने १ जानेवारी ते ३१ डिसेंबर असे शैक्षणिक वर्ष जाहीर करावे, अशी आमची मागणी आहे. केंद्र सरकारने मंजूर केलेल्या कृषी विधेयकाच्या संदर्भात बारामती कुणाच्या बापाची पेंड नाही, असे बोललो. पण याचा चुकीचा अर्थ विरोधकांनी जाणीवपूर्वक काढला. आमची कुणाचा बाप काढण्याची संस्कृती नाही.