हमीदवाडा (प्रतिनिधी) : कागल तालुक्यातील बेनिक्रे येथील ग्रामसेवक आण्णाप्पा कुंभार यांच्या भ्रष्ट कारभाराकडे वरिष्ठ अधिकारीदेखील कानाडोळा करीत आहे. तर असल्या ग्रामपंचायत कार्यालयालायाचा उपयोगच काय ?. असा सवाल करीत चक्क सरपंच, उपसरपंच आणि सदस्यांनीच कार्यालयाला आज (शुक्रवार) टाळे ठोकले. गेल्या वर्षभरापासून गटविकास अधिकारी, जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे वारंवार लेखी तक्रार करूनही दखल घेतली गेली नसल्याने संतप्त झालेल्या सदस्यांनी हे पाऊल उचलले.

यावेळी घरफाळा व पाणीपट्टी वसूल करून बँक खात्यात जमा न करता परस्पर खर्च करणे, शासनाकडून आलेला निधी तीन वर्षांपासून वाटप झालेला नाही. कर्मचाऱ्यांना मानधन व फंडाची रक्कम मिळालेली नाही. आशा स्वयंसेविकांना कोरोना काळातील अनुदानही दिलेले नाही. सरपंच, सदस्यांना विश्वासात न घेताच ग्रामसेवक कुंभार हे कारभार करत आहेत. याबाबत वरिष्ठाकडे तक्रार करुनही दखल घेतली गेली नाही. अखेर संतापलेल्या सरपंच, उपसरपंच आणि सदस्यांनीच ग्रामपंचायत कार्यालयाला टाळे ठोकले.

यावेळी सरपंच अश्विनी गुरव, संदीप वाडकर, कृष्णा जाधव, शिपाई आनंदा वाडकर, दिव्यांग प्रतिनिधी नीलेश हासबे, आशा स्वयंसेविका अस्मिता पालकर, माजी सरपंच काकासाहेब काळूगडे, दिनकर मगदूम, उपसरपंच सूर्याजी जाधव, सदस्य सचिन वाडकर, सतीश पालकर आदी उपस्थित होते.