मुंबई (प्रतिनिधी) : राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळातर्फे दहावी परीक्षेचा निकाल आज (शुक्रवार) ऑनलाईन पद्धतीने जाहीर करण्यात आला. हा निकाल विद्यार्थ्यांना http://result.mh-ssc.ac.in, http://mahahsscboard.in या अधिकृत संकेतस्थळावर पाहावा असे सांगण्यात आले. मात्र दुपारी १ नंतर काही वेळातच दोन्ही वेबसाईट डाऊन झाल्या. तब्बल पाच तासांहून अधिक वेळ झाला तरी वेबसाईट डाऊन आहेत. यामुळे विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी यासंदर्भात संताप व्यक्त केला आहे.

तर भाजप नेते अतुल भातखळकर यांनी राज्य सरकारवर निशाणा साधलाय. दहावीच्या निकालाची वेबसाईट सुरु करण्यासाठी बोर्डाचे प्रयत्न सुरु आहेत. बोर्डाचे अध्यक्ष दिनकर पाटील आणि तांत्रिक सदस्यांची बैठक सुरु आहे. वेबसाईट पूर्ववत झाल्यानंतर विद्यार्थ्यांना निकाल पाहायला मिळेल. मात्र बोर्डाला एकाच वेळी अनेक विद्यार्थी या वेबसाईटवर जाऊन निकाल पाहण्याचा प्रयत्न करतील, त्यामुळे वेबसाईटवर ताण येऊ शकतो हे माहिती नव्हते का, तांत्रिक बाबींची तयारी करता आली नाही का असे सवाल उपस्थित होत आहेत. निकाल समजत नसल्याने विद्यार्थ्यांसह पालकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला आहे.