कोल्हापूर (प्रतिनिधी) : गांधीनगर ग्रामपंचायतीच्या कर्मचाऱ्याला पाणी सोडण्याच्या कारणावरून मारहाण करुन जखमी केले. याप्रकरणी सरकारी कामात अडथळा करुन मारहाण केल्याबद्दल आज (गुरुवार) एकाला ५ वर्षांची सक्तमजुरीची शिक्षा आणि २ हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा जिल्हा व सत्र न्यायाधीश पी. जी. भोसले यांनी सुनावली. स्वप्नील उर्फ युवराज अनंतराव मिरजकर (वय ३४, रा.कोयना कॉलनी, गांधीनगर) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी सरकारी वकील म्हणून अॅड. समीउल्ला पाटील यांनी काम पाहिले.

गांधीनगरमध्ये दि. १५ ऑगस्ट २०१५ रोजी ग्रामपंचायत कर्मचारी संजय देवकूळे हे कोयना कॉलनीमध्ये पाणी सोडत असताना त्यांना प्रतिबंध करून स्वप्नील मिरजकर यांनी आमच्या गल्लीत कमी दाबाने पाणी का सोडतो ? असा सवाल करत शिवागाळ करत बांबूने डोक्यात मारहाण करून जखमी केले. याबाबत गांधीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होवून न्यायालयात दोषारोपत्र दाखल झाले. या प्रकरणी सरकारी पक्षातर्फे दहा साक्षीदार तपासण्यात आलेत.

प्रथमदर्शनी पुरावा, सरकारी वकिलांनी केलेला युक्तिवाद याचा विचार करून स्वप्नील मिरजकर याला पाच वर्ष सक्तमजुरी आणि २ हजार रुपयांची दंडाची शिक्षा सुनावली. याकामी गांधीनगर पोलिसांचे सहकार्य लाभले.