बिष्णोई टोळीतील एकाला कोल्हापूरात अटक…

0
254

कोल्हापूर (प्रतिनिधी) : प्रसिद्ध पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला हत्या प्रकरणातील बिष्णोई टोळीतील एका गुंडाला कोल्हापूरात अटक करण्यात आली. मोहित उर्फ शेराजगबीरसिंग मलीक असे त्याचे नाव असून त्याला रंकाळा पदपथ उद्यान येथे स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने सापळा रचून पकडले.

मलिक याच्यावर विविध ठिकाणी खून, खंडणी अशा प्रकारचे गुन्हे दाखल असून तो चार महिने फरारी होता. मलिक हा कोल्हापूरात असल्याची खात्रीदायक बातमी पोलीसांना मिळाली होती. त्यासाठी पोलीस अधिक्षक शैलेश बलकवडे यांनी पोलीसांना आदेश दिले होते. त्यानुसार स्थानिक गन्हा अन्वेषणचे पोलीस निरिक्षक संजय गोर्ले, पोलीस निरिक्षक किरण भोसले यांनी त्याचा शोध सुरु केला.

यावेळी पोलीसांना मलिक हा रंकाळा टॉवर परिसरात भाड्याच्या खोलीत रहात असल्याची खात्रीलायक बातमी मिळाली. पोलीसांनी शोध सुरु केल्यावर त्यांना मलिक हा रंकाळा टॉवर परिसरात फिरण्यासाठी आल्याची गोपनिय माहिती मिळाली. पोलीसांनी रंकाळा टॉवर येथे गेले असता त्यांना तो पदपथावर थांबलेला दिसला. यावेळी पोलीसांनी त्याचा फोटो पाहून खात्री केली. त्यानंतर नियोजनबद्धरित्या मलिक याला ताब्यात घेतले. यावेळी मलिक यांनी झटापट करुन पळून जाण्याचा प्रयत्न केला. परंतु, पोलीसांच्या नियोजनबद्ध कारवाईमुळे त्याचा हा प्रयत्न अयशस्वी ठरला.