हरकतींची पडताळणी करुन शंभर टक्के निराकरण करणार : कादंबरी बलकवडे

0
44

कोल्हापूर (प्रतिनिधी) : महानगर पालिकेच्या निवडणूकीसाठी प्रसिद्ध करण्यात आलेल्या प्रारूप मतदान यादीबाबत मोठ्या प्रमाणात हरकती दाखल होण्याचा ओघ वाढत आहे. आलेल्या हरकतींची पडताळणी करुन शंभर टक्के निराकरण केले जाईल. असे प्रशासक कादंबरी बलकवडे यांनी आज (सोमवार) स्पष्ट केले.

निवडणूकीसाठी प्रसिद्ध करण्यात आलेल्या प्रारुप मतदान यादीबाबत आत्तापर्यंत ४३३ हरकती दाखल झाल्या आहेत. यामध्ये प्रामुख्याने प्रभागात वास्तव्यास नसलेल्या मतदारांची नावे समाविष्ट करण्यात आली असून त्यांच्या मूळ प्रभागातील नावे काढल्याच्या तक्रारी अधिक आहेत. यामध्ये ३०० मतदारांपासून २ हजारांहून अधिक मतदारांची नावे बदलली गेली असल्याचे स्पष्ट झाले आहे.

त्यामुळे सर्वच राजकीय पक्ष, इच्छुक उमेदवार आणि सामाजिक संघटना यांनी काही सामुदायिक हरकती दिल्या आहेत. यामध्ये जाहिर केलेल्या प्रारूप मतदार याद्या रद्द कराव्यात, अशी मागणी केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने शहराध्यक्ष आर. के. पोवार यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने दिलेल्या निवेदनात मतदार याद्या रद्द करुन नवीन मतदार याद्या तयार करण्यासाठी सर्वेक्षण करण्यासाठी मुदतवाढ द्यावी, अशी मागणी केली आहे.

माजी नगरसेवक पांडूरंग आडसुळे यांनी, शहरातील ८१ प्रभागात मतदार यादीचा घोळ असून प्रत्येक प्रभागासाठी सर्व्हे इंजिनियरची नेमणूक केली असताना त्यांनी हे काम योग्य पद्धतीने केले नाही. प्रभागात न जाता जाग्यावर बसून कामे केल्याने अशा प्रकारे मोठ्या प्रमाणात मतदारांची नावे इतर प्रभागात गेली आहेत. हे काम आता दुबार करावे लागणार आहे. त्यामुळे प्रशासकीय यंत्रणेचा वेळ वाया जाणार आहे. म्हणून चुकीचे काम करणाऱ्या अधिकारी, कर्मचारी यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.