टोप (प्रतिनिधी) : हातकणंगले तालुक्यातील नागांव येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर येथे  मोमीन ग्लास अॅण्ड प्लायवूड सप्लायर्स या गोडाऊनमध्ये मालवाहतूक  गाडीत ग्लास (काच) भरत असताना काच फुटून अंगावर पडल्याने गाडीचालकाचा मृत्यू झाला. तर येथील एकजण जखमी झाला आहे. संदीप सदाशिव खरोसे (वय 33, रा. फुलेवाडी नरसिंह कॉलनी, प्लॉट नंबर 3) असे या मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. तर जखमीवर उपचार सुरु असून त्याचे नाव अद्याप समजलेले नाही.

शिरोली पोलिसातून मिळालेल्या माहितीनुसार,  आज (मंगळवार)  सकाळी अकरच्या सुमारास  क्रेनच्या सहाय्याने पाच ते सहा फुटांचे ग्लास (काच)  एमएच ०९ एफएल २४६३) या मालवाहतूक करणाऱ्या गाडीमध्ये भरत होते. यावेळी या गाडीचा हँडब्रेक व्यवस्थित न लागल्याने गाडी मागे सरकरली. त्यामुळे क्रेनचा बँलेन्स निसटल्यामुळे या  ग्लास  गाडीतच धडकून  फुटल्या. या काचांच्याखाली सापडून संदिप खरोसे आणि त्याच्या सोबत असणारा अन्य एकजण असे  दोघे गंभीर जखमी झाले.

त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले असता संदिपचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. यावेळी सपोनि. राजेश खांडवे यांनी तात्काळ घटनास्थळावर धाव घेतली. तर मयताच्या नातेवाईकांनी गुन्हा दाखल झाल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचे सांगितले. त्यामुळे बराच काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांनी संबंधितावर दाखल करण्याची ग्वाही दिल्याने उशिरा मृतदेह ताब्यात घेऊन अंतसंस्कार करण्यात आले.  या घटनेची नोंद शिरोली पोलीसांत झाली आहे.