इचलकरंजी (प्रतिनिधी) : बहिणीला शिवीगाळ केल्याचा जाब विचारायला गेलेल्यावर चाकूहल्ला करुन जखमी केल्याप्रकरणी शिवाजीनगर पोलिसात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अंकुश लक्ष्मण लामतुरे (वय ३५, रा. कबनूर) असे जखमीचे नांव असून देवानंद रामचंद्र जाधव (वय ३०, रा. कबनूर) याच्यावर गुन्हा दाखल आहे.

याबाबत पोलिसांतून मिळालेली माहिती अशी, बहिणीला शिवीगाळ केल्याबाबतचा जाब विचारण्यासाठी फिर्यादी अंकुश आणि त्याची आई हे दोघेजण देवानंद जाधव याच्या घरी गेले होते. त्यावेळी त्यांच्यात वाद होऊन देवानंद याने अंकुश आणि त्याच्या आईला शिवीगाळ करत धक्काबुक्कीसह मारहाण केली. तसेच घरातील चाकू आणून अंकुश याच्या मनगटावर वार केला. या झटापटीत चाकू अंकुश याच्या डोक्याला लागल्याने तो जखमी झाला आहे. त्याच्यावर इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयात उपचार सुरु असून देवानंद जाधव याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.