इचलकरंजी येथे प्रेमविवाह केल्याच्या कारणावरुन एकास मारहाण : चौघांना अटक

0
111

इचलकरंजी (प्रतिनिधी) : इचलकरंजी येथे प्रेमविवाह केल्याच्या कारणातून काल (शनिवार) रात्री एकावर खुनी हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात रमजान सय्यद शेख (वय ४१, रा. आसरानगर, इचलकरंजी) हे जखमी झाले आहेत. याप्रकरणी चौघांच्या विरोधात गावभाग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान, पोलिसांनी महेश घारुंगे, आकाश घारुंगे, सनी माछरे या तिघांना अटक केली असून एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतलं आहे.

इचलकरंजी येथील आसरानगर इथे राहणारे रमजान शेख यंत्रमाग कामगार आहेत. त्यांच्या मुलाने काही दिवसापूर्वी परिसरातीलच एका युवतीशी प्रेमविवाह केला होता. तेंव्हापासून शेख कुटूंबीयावर युवतीचे नातेवाईक चिडून होते. काल रात्री अकराच्या सुमारास महेश घारूंगे, आकाश घारूंगे आणि सनी माछरे यांच्यासह चौघांनी रमजान शेख यांच्या घरात घुसून शिवीगाळ करत लाकडी ओंडक्यानं डोक्यात, पाठीवर मारहाण केली. या हल्ल्यात रमजान शेख गंभीर जखमी झाले. नातेवाईकानी शेख यांना उपचारासाठी त्वरीत आयजीएम रुग्णालयात दाखल केले.

या घटनेची माहिती मिळताच पोलिस उपाअधीक्षक बाबूराव महामुनी, गावभाग पोलीस ठाण्याचे निरीक्षक गजेंद्र लोहार यांनी रुग्णालयात धाव घेऊन माहिती घेतली. मिळालेल्या माहितीनुसार महेश घारुंगे, आकाश घारुंगे, सनी माछरे या तिघा संशयीतांना अटक केली असून एका अल्पवयीन मुलास ताब्यात घेतलं आहे.