कोतोलीतील चोरी प्रकरणी एकास अटक

0
122

पन्हाळा (प्रतिनिधी) : पन्हाळा तालुक्यातील कोतोली येथे मुख्य बाजारपेठेत असलेल्या मोबाईल दुकानाचा दरवाजा फोडून चोरलेल्या आठ मोबाईलसह एक लाख रुपयाचा मुद्देमाल लंपास करणाऱ्या स्नेहकित संजय पाटील (वय २३, कोतोली) याला अटक करण्यात आली. त्याच्याकडून मुद्देमाल जप्त करण्यात आला असून त्याला आठ तारखेपर्यंत पोलीस कोठडी मिळाली आहे.

कोतोली येथील रोहित सुतार यांचे ‘समर्थ’ नावाचे मोबाईल दुकान आहे. महिन्यापूर्वी चोरट्यांनी  बाजूला असलेल्या रंगीला फुटवेअर दुकानच्या बाजूने दरवाजा गॅसकटरने कापून मोबाईल दुकानामध्ये प्रवेश केला होता. किमती मोबाईल व अॅक्सिसरीज घेऊन तेथून पळ काढला. चोरीसाठी आणलेले साहित्य तेथेच टाकून चोरटे पसार झाला. सी.सी.टी. व्ही. कॅमेर्‍यात चोरटे कैद झाले असले तरी पन्हाळा पोलिसांनी ठसे तज्ञ व श्वानाच्या साह्याने चोरट्यांचा परिसरात शोध घेण्याचा प्रयत्न करण्यात आला.

सायबर विभागाच्या मदतीने पोलिसांनी गुन्हा उघडकीस आणत कोतोलीमधील आरोपी स्नेहकित पाटील यास अटक करुन मुद्देमाल हस्तगत केला. पोलीस निरीक्षक अरविंद काळे व उपनिरीक्षक रमेश ठाणेकर किशोर पाटील यांनी हा गुन्हा उघडकीस आणला.