कोल्हापूर (प्रतिनिधी) :  अंबाई टँक परिसरात घातक शस्त्रांची विक्री करण्यासाठी आलेल्या एकाला जुना राजवाडा पोलिसांनी सापळा रचून अटक केली. किशोर भगवान मेस्त्री (वय ३१ रा. मुळगाव पाठपरोळे कुडाळ, सध्या रा. लक्षतीर्थ वसाहत) असे अटक केलेल्या आरोपीचे  नाव आहे. त्याच्याकडून चार तलवारी,  एक मोटर सायकल एक मोबाईल हँडसेट असा सुमारे ६६ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की,  इंगवले कॉलनी लक्षतीर्थ वसाहत येथे राहणारा किशोर मेस्त्री हा तलवारी, चाकू, कट्यार गुप्ती अशा घातक हत्यारांचा साठा करून त्याची विक्री करत असल्याची माहिती जुना राजवाडा पोलिस ठाण्यातील गुन्हे शोध पथकाला मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी अंबाई टँक परिसरात सापळा रचला होता. या ठिकाणी विक्रीसाठी आलेल्या किशोर मेस्त्री याला अटक केली. त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्याच्याकडून चार तलवारी, एक मोटरसायकल व एक मोबाईल हँडसेट असा ६६ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, अप्पर पोलीस अधीक्षक तिरुपती काकडे,  शहर पोलीस उपाधीक्षक डॉ. प्रशांत अमृतकर  यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रमोद जाधव, पोलीस उपनिरीक्षक योगेश पाटील आदीनी या कारवाईमध्ये सहभाग घेतला.