भुदरगड तालुक्यातील धरणे वेळेपुर्वीच भरण्याच्या मार्गावर…

गारगोटी (प्रतिनिधी) : भुदरगड तालुक्यातील फये, मेघोली धरणे यावर्षी पुर्ण क्षमतेन भरली असुन शेतकर्‍यांच्यातून समाधान व्यक्त होत आहे. तर तालुक्याला वरदायी समजाला जाणारा पाटगाव मौनीसागर जलाशय आणि चिकोत्रा मध्यम प्रकल्प नियोजित वेळेपूर्वी  भरण्याच्या मार्गावर आहेत.

तालुक्यातील कोंडोशी तलाव गेल्या आठवड्यात भरला असून मेघोली, फये तलाव भरले आहेत. पाटगाव मध्यम प्रकल्पाच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत असुन पावसाचे प्रमाणात वाढ झाल्यास मौनीसागर जलाशयही लवकरच भरण्याच्या मार्गावर आहे. अशी माहिती उपविभागीय अधिकारी संभाजी भोपळे यांनी दिली.

फये तलाव कार्यक्षेत्रात झालेल्या चांगल्या पावसामुळे हा तलाव भरला आहे. या तलावाची ३३. ४२ मीटर उंची व ३५५. ६५ मीटर लांबी आहे. ८८. २५ मीटर पुर्ण संचय पातळी आहे. या तलावातील पाण्यावर ऊसपीक मोठया प्रमाणात घेतले जाते. तसेच उन्हाळी व रब्बी हंगामातही पिके घेतली जातात. या प्रकल्पामध्ये ३.९३ दलघमी पाणीसाठा झाला. प्रकल्पांतर्गत ९७२ हेक्टर लाभक्षेत्र असून सिंचन क्षेत्र ७०० हेक्टर आहे. शेतीच्या पाण्यासाठी मोर ओहोळेवर बारा बंधारे बांधण्यात आले आहेत. या प्रकल्पातील पाण्याचा लाभ फये, कोळवण, भाटीवडे, गिरगाव, हेदवडे, भूमकरवाडी, पाळेवाडी, कोळवण या गावातील शेतीला होतो.

मेघोली लपा तलावात ९८.४८ दलघमी पाणीसाठा झाला आहे. १११. ५० मीटर पाणी पातळी आहे. या तलावामुळे मेघोली, तळकरवाडी, नवले, वेंगरूळ गावातील शेतकर्‍यांना लाभ होणार आहे. चिकोत्रा मध्यम प्रकल्पाची ६८८ मीटर पुर्ण संचय पाणी पातळी असुन ६८६.७० मीटर पाणी पातळी झाली आहे. प्रकल्पात ३९.८४२ दलघमी पाणीसाठा झाला आहे. ८ तासात ५ मीमी पाऊस झाला असुन जुन पासुन १ हजार ८६१ मिमी. पाऊस झाला आहे.

मौनीसागर जलाशयात ९१.५० टक्के पाणीसाठा, पाटगाव मौनीसागर जलाशयात ९६ दलघमी पाणीसाठा झाला आहे. जुनपासून ३ हजार ९२६ मिमी. पाऊस झाला आहे. तर जलाशयातुन २५० विद्युत विसर्ग सुरु असुन वाघापूर, निळपण बंधारे अद्याप पाण्याखाली आहेत. गेल्या ८ तासात १५ मिमी. पाऊस झाला आहे. पावसाचे प्रमाण वाढल्यास जलाशय लवकरच पुर्ण क्षमतेने भरणार असल्याचे सांगण्यात आले.