श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांच्या अमृतमहोत्सवानिमित्त कोल्हापूर जिल्ह्यात अनेक कार्यक्रम आयोजित केले जात आहेत. यामध्ये निकाली कुस्त्यांच्या जंगी मैदानाचे आयोजन देखील केले असून या लढती खासबाग मैदान कोल्हापूर येथे पार पडणार आहेत. यावेळी श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांच्यासह राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार देखील उपस्थित असणार आहेत.

आज ७ जानेवारी रोजी होणाऱ्या लढतींच्या पार्श्वभूमीवर ‘स्वराज्य’ संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी खासबाग मैदान येथे सकाळी दाखल झाले आहेत, त्यांनी आयोजकांना सुचना देत नियोजनाचा धावता आढावा घेतला. या कार्यक्रमासाठी अनेक दिग्गज मल्ल तसेच क्रिडा क्षेत्रातील तज्ज्ञ, व लोकप्रतिनिधी देखील उपस्थित राहणार आहेत.

कशा होतील लढती ?

या मैदानामध्ये 1 नंबरच्या लढतीसाठी कोल्हापूरच्या गंगावेश तालमीचा मल्ल महान भारत केसरी पै. सिकंदर शेख विरुध्द पंजाबचा मल्ला हिंदू केसरी, भारत केसरी पै. गौरव मच्छीवाला यांच्यामध्ये लढत होणार आहे. यामध्ये विजेत्या मल्लाला चांदीची गदा देवून सन्मानीत करण्यात येणार आहे. 2 नंबरच्या लढतीसाठी गंगावेश तालमीचा उपमहाराष्ट्र केसरी पै. प्रकाश बनकर विरुध्द पंजाब मधील गुरुभवानी आखाडयाचा मल्ल पै. सतनाम सिंग यांच्यात लढत होणार आहे.

‘खासबाग’ कुस्ती शौकिनांनी गजबजणार

कोल्हापूरला कुस्तीची अनेक वर्षांची परंपरा असून आज आयोजित केलेल्या कुस्ती मैदानामुळे शौकिनांसह करवीरवासियांना चटकदार कुस्त्यांची मेजवानी मिळणार आहे. मोठ्या कुस्त्यांसह इतर १०७ कुस्त्यांची लढत असणार आहे. या पार्श्वभूमीवर तयारी पुर्ण झाली असून आखाड्यामध्ये नवीन माती टाकण्यात आली आहे. मैदानाची दक्षिण व पश्चिम बाजू समपातळी करून घेण्यात आली आहे. तेथील राजर्षी छत्रपती शाहू खासबाग कुस्त्यांचे मैदान हा फलकही रंगवून घेण्यात आला आहे.

विविध कार्यक्रमांचे आयोजन

श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांचा अमृतमहोत्सव वैविध्यपूर्ण उपक्रमांनी साजरा होत असून आज राजर्षी शाहू सलोखा फेरी काढण्यात येत आहे. शिवाजी पेठेतील उभा मारुती चौकातून सकाळी दहा वाजता त्यास सुरुवात होईल. राजर्षी शाहू सलोखा मंचतर्फे त्याचे आयोजन केले आहे. शिव-शाहूंचा वारसा व पुरोगामी विचारांचे पाईक असणाऱ्या श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांच्या वाढदिवसाची जय्यत तयारी करण्यात आली आहे. शहरासह जिल्ह्यात विविध कार्यक्रम होणार आहेत.

उभा मारुती चौकातून निघणाऱ्या शाहू सलोखा फेरीचा बिनखांबी गणेश मंदिर, महाद्वार रोड, पापाची तिकटी, छत्रपती शिवाजी महाराज चौक, सीपीआर, दसरा चौक ते न्यू पॅलेस असा मार्ग असणार आहे. पॅलेसमध्ये जाऊन त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात येतील. तरी विविध समाज संस्था, सर्वपक्षीय कार्यकर्ते, तालीम मंडळे, वसतिगृह पदाधिकारी व शाहूप्रेमींनी त्यात सहभागी व्हावे, असे आवाहन मंचचे निमंत्रक वसंतराव मुळीक यांनी केले आहे.