आजरा (प्रतिनिधी) : चंदगड तालुक्यात सतत पडणाऱ्या अतिवृष्टीमुळे नदी, नाले तुडुंब भरून वाहत असून अनेक मार्गावर पुलावर पाणी आले आहे. निटूर – घुलेवाडी मार्गावर ओढ्याच्या पुलावरुन पुराच्या पाण्यातून दुचाकी घेऊन जाण्याचा प्रयत्न फसला. तोल जाऊन पाण्यात पडून घुलेवाडी (ता. चंदगड) येथील कल्पना तुकाराम कंग्राळकर ही महिला वाहून गेली. आज (गुरुवार) सायंकाळी साडेसातच्या सुमारास हा दुर्दैवी प्रकार घडला. दुचाकीस्वार सौरभ पांडुरंग कंग्राळकर व सुनीता पांडुरंग कंग्राळकर यांना स्थानिक तरुणांनी मोठ्या प्रयासाने वाचविले.

याबाबत अधिक माहिती अशी की आज सायंकाळी साडेसातच्या सुमारास कंग्राळकर कुटुंबीय कार्वेहून निटूरमार्गे घुलेवाडीला दुचाकीवरून गावी जात होते. या मार्गावरील ओढ्याच्या पुलावर पाणी आले होते. ग्रामस्थ जाऊ नका म्हणून सांगत असतेवेळी सौरभ यांनी दुचाकी पुराच्या पाण्यातून घातली. पाण्याचा अंदाज न आल्याने त्यांची दुचाकी पाण्यात अडकली. ते तिघेही तोल जाऊन पाण्यात पडले आणि वाहून गेले. स्थानिक तरुणांनी धाडसाने पाण्यात जात त्यांना वाचविण्याचा प्रयत्न सुरु केला. मात्र कल्पना कंग्राळकर या पाण्यातून वाहून गेल्या. सुदैवाने सौरभ कंग्राळकर व सुनीता कंग्राळकर यांना वाचविण्यात यश आले.

घुलेवाडीचे सरपंच युवराज पाटील, ऋतुराज पाटील, राहुल पाटील, आदिनाथ पाटील व सुभाष पाटील यांच्या प्रयत्नाने आणि धाडसानेच दोघांचे प्राण वाचले. मात्र कल्पना कंग्राळकर या वाहून गेल्यामुळे परिसरासह चंदगड तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे.