कोल्हापूर (प्रतिनिधी) : आज अश्विन शुद्ध नवमी शारदीय नवरात्र महोत्सवाचा आजचा अखेरचा दिवस. आज करवीर निवासिनी श्री अंबाबाईची शिवदूती चामुंडेच्या रूपामध्ये सजली आहे. आजवरच्या सर्व मातृका कुठल्या न कुठल्या पुरुष देवतेच्या शक्तिरूप होत्या. पण शक्तीतून निर्माण झालेली साक्षात शक्ती अशी ही उग्र चामुंडा शिवदूती आहे.

सर्व मातृकागणांचा प्रादुर्भाव झाल्यानंतर जगदंबा कौशिकीच्या शरीरातून एक अति भीषण, उग्र अशी देवी प्रकट झाली. तीचे वाहन असणारा कोल्हा शेकडो कोल्ह्यांच्या कोल्हेकुई सारखा ध्वनी प्रगट करत होता. अशा त्या जगदंबेने भगवान शंकरांना स्वतःजवळ बोलावले आणि शुंभ-निशुंभ यांना शेवटची समज देण्यासाठी दूत म्हणून पाठवले. तेंव्हा तिला शिवदूती असे नाव मिळाले.

ही देवी मातृका सर्वात शेवटची मातृका म्हणून चितारली जाते. गर्भागारामध्ये आज खड्ग, डमरू, त्रिशूळ, पानपात्र आणि कोल्ह्यावरती स्वार अशी उग्र चामुंडा शिवदूती या रूपामध्ये जगदंबा विराजमान आहे. आद्य शक्ती जगदंबा आजच्या नवमीच्या तिथीला सर्व भक्तजनांवरती अखंड कृपा करून या मातृकागणांकरवी आपला इहपरत्र सांभाळ करो, हीच जगदंबे चरणी प्रार्थना.