कोल्हापूर (विवेक जोशी)  : श्री विठ्ठल, पांडुरंग म्हणजे अखंड महाराष्ट्राचे आराध्यदैवत. सोलापूर जिल्ह्यातील श्री क्षेत्र पंढरपूर येथे चंद्रभागेच्या काठी, विटेवर विसावलेल्या सावळ्या विठ्ठलाच्या दर्शनासाठी असंख्य भक्त, वारकरी येत असतात.

जातां पंढरीसी सुख वाटे जीवा

आनंदे केशवा भेटतांचि

या सुखा उपमा नाही त्रिभुवनी

पाहिली शोधोनी अवघी तीर्थे

असे म्हणत महाराष्ट्राच्या काना-कोपऱ्यातून निघून लाखो भाविक, वारकरी विठ्ठल नामाचा गजर करीत हातात टाळ, खांद्यावर भगवी पताका, साथीला मृदंग अशा वेषात आषाढी एकादशीदिवशी पायी चालत पंढरपूरला पोचतात. आषाढी एकादशीपासून चतुर्मास सुरू होतो. त्या दिवशी देव झोपतात म्हणून या एकादशीला ‘देवशयनी एकादशी’ असेही म्हणतात. उद्या आषाढी एकादशी. दरवर्षी शेकडो दिंड्या, पालख्यांसोबत वारकरी पंढरीत दाखल होत असतात. पण यंदा कोरोना संकटामुळे सलग दुसऱ्या वर्षी पायी वारी निघालेली नाही.

एरवी दरवर्षी (२०२० आणि सध्याचे २०२१ या वर्षाचा अपवाद वगळता) चंद्रभागा नदीचा काठ आणि तिच्या शेजारी असलेल्या वाळवंटाचा परिसर भाविकांच्या मांदियाळीने फुलून गेलेला असतो. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मागील वर्षाप्रमाणे यंदाही चंद्रभागेचा काठ सुनासुना आहे. ना टाळ-मृदंगाचा ताल, ना विठूनामाचा गजर, ना विठुरायाच्या दर्शनासाठी देहभान विसरून तासनतास रांगेत उभारलेले वारकरी, ना भजन, ना कीर्तन… ना प्रशासकीय अधिकारी, पोलिसांची लगबग… ना स्थानिक मठातील पदाधिकाऱ्यांची गडबड… सर्व काही सुनंसुनं…

गेल्यावर्षी पहिल्यांदा ह्या वारीत खंड पडला. छोट्या स्वरुपात वारीचा सोहळा पार पडला. कारण कोरोना महामारीचं संकट. यावर्षीही हे संकट कायम आहे. कोरोनाची तिसरी, चौथी लाट येण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळेच यावर्षीही वारी ही प्रतीकात्मक स्वरुपात करावी, असा निर्णय प्रशासनाने दिला. त्यामुळे सर्वांचाच हिरमोड झाला. ड्रोनच्या सहाय्याने टिपलेली चंद्रभागा नदीकाठची काही दृश्यं पाहिली तर उदासीचं एका मळभ मनावर दाटून येतं.

‘बा रे पांडुरंगा, केव्हा भेट देशी ?’ असं काकुळतीने विनविणाऱ्या सर्वसामान्य भाविकाला यंदाही आपल्या सावळ्या परब्रह्माचं रूप पाहायला मिळणार नाहीये. त्याच्या पायावर डोके ठेवून अत्युच्च आनंदाचा क्षण अनुभवायला मिळणार नाहीये. यामुळे भाविक, वारकऱ्यांसह चंद्रभागाही खिन्न झाली आहे.

‘पांडुरंगा, मानवजातीवरचे कोरोनाचे संकट लवकर टळू दे आणि पुन्हा एकदा माझ्या काठी वैष्णवांचा मेळा जमू दे, टाळ-मृदंगाच्या तालावर विठ्ठलनामाची शाळा भरू दे’, अशीच तर आळवणी ‘चंद्रभागा’ करीत नसेल ना..?