तेल उत्पादक देशांच्या अरेरावीमुळे इंधन दर पुन्हा वाढणार…

0
91

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सध्या इंधन दरातील भरमसाट दरवाढीमुळे सर्वसामान्य हवालदिल झाले आहेत. आधीच कोरोनामुळे आर्थिक संकटात सापडलेला सर्वसामान्य व्यक्ती मेटाकुटीला आला आहे. त्यातच आता पुन्हा इंधन दरात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. ‘ओपेक’ मधील देशांनी कच्च्या तेलाचे उत्पादन वाढवायला स्पष्ट नकार दिला आहे. मागणी आणि उत्पादन यातील तफावतीमुळे कच्च्या तेलाच्या किमती ६५ डॉलर्स प्रति बॅरलहून आणखी वाढण्याची शक्यता असल्याने भारतात इंधन दर आणखी वाढले तर नवल नाही.

ओपेक (OPEC – Organisation of Petroleum Exporting Countries) ही कच्च्या तेलाचं उत्पादन आणि पुरवठा करणाऱ्या देशांची संघटना आहे. कच्च्या तेलाचा वापर करून पेट्रोल इंधनाची निर्मिती केली जाते. या संघटनेमध्ये प्रामुख्याने आखाती देश – संयुक्त अरब अमिराती, सौदी अरेबिया, कतार, नायजेरिया, कुवैत, लिबिया, गबॉन, इराण, काँगो, व्हेनेझ्युएला, इराक, इक्वेडॉर, अल्जेरिया यांचा समावेश आहे.

सामान्यपणे जगाची कच्च्या तेलाची गरज भागवण्यासाठी आणि किंमती स्थिर ठेवण्यासाठी सुमारे १५ लाख बॅरल प्रतिदिन कच्च्या तेलाच्या उत्पादनाची आवश्यकता असते. मात्र, ओपेक देशांनी कच्च्या तेलाचं १० लाख बॅरल प्रतिदिन इतकंच उत्पादन घेण्याचा निर्णय घेतला. OPEC च्या नुकत्याच झालेल्या ऑनलाईन बैठकीमध्ये उत्पादन वाढवण्यावर एकमत होऊ शकलेलं नाही. आता १ एप्रिल रोजी पुन्हा बैठक होणार आहे. जर उत्पादन वाढलं, तरच आंतरराष्ट्रीय बाजारात पेट्रोलच्या किमती कमी होण्याची शक्यता आहे. पण हे होण्याची शक्यता धूसर आहे. सामान्यांना दिलासा देण्यासाठी केंद्र व राज्य सरकारने करांमध्ये कपात करण्याची गरज आहे.