कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर महापालिकेतील अधिकाऱ्यांनी कामाची क्षमता वाढवावी. मंजूर झालेले प्रकल्प पूर्ण करण्याकरिता प्रत्येक प्रकल्पाच्या नियोजनासाठी व देखरेखीसाठी स्वतंत्र प्रभारी प्रकल्प अधिकारी नियुक्त करावेत, अशा सुचना राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी महापालिका आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे यांना दिल्या. प्रशासनास विविध योजना व प्रकल्पांसाठी मंजूर झालेल्या निधीसंदर्भात महापालिकेत आज (गुरूवार) आढावा बैठक झाली.

यावेळी क्षीरसागर म्हणाले की, शहरातील प्रमुख मार्ग असणाऱ्या आखरी रास्ताचे काम अर्धे झाले आहे. आ. चंद्रकांत जाधव यांच्या निधनामुळे उर्वरित रस्त्याच्या कामाची प्रक्रिया झालेली नाही. त्यामुळे उर्वरित रस्त्याचे काम प्रशासनाने स्वनिधीतून तत्काळ करावे. मंजूर निधीतून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे स्मारक व क्रीडा संकुलाचे काम तत्काळ सुरु करावे. ऐतिहासिक रंकाळा तलावास रु.१५ कोटींचा निधी मंजूर झाला आहे. त्यामुळे तातडीने सुशोभिकरण आणि संवर्धन आराखड्यानुसार कामाच्या निविदा प्रसिद्ध कराव्यात.

महापालिका हद्दीतील रस्ते, गटर, भुयारी मार्ग व फुटपाथ करण्याच्या कामांना २०३ कोटींचा निधी मंजूर झाला आहे. त्याचा प्रस्ताव प्रशासनाकडून सादर केलेला नाही, याबाबत क्षीरसागर यांनी विचारणा केली. गांधी मैदानात साठणाऱ्या पाण्याचा निचरा व्हावा, याकरिता कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी आराखडा तयार करून गांधी मैदानाचे काम नगरोत्थानच्या निधीमधून मार्गी लावावे, अशा सूचना क्षीरसागर यांनी दिल्या.

यावर आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे यांनी, झालेल्या चर्चेनुसार सर्वच गोष्टींकडे महापालिका प्रशासन सकारात्मक असून येत्या काळात प्रलंबित कामे मार्गी लावण्याची ग्वाही दिली.

यावेळी शिवसेना शहरप्रमुख जयवंत हारुगेल, माजी स्थायी समिती सभापती नंदकुमार मोरे, ऋतुराज क्षीरसागर, किशोर घाटगे, निलेश हंकारे, शहर अभियंता नेत्रदिप सरनोबत, कार्यकारी अभियंता हर्षजीत घाटगे, एन.एस.पाटील, संजय सरनाईक यांच्यासह इतर विभागांचे अधिकारी उपस्थित होते.