मुंबई (प्रतिनिधी) : योगगुरु बाबा रामदेव यांनी अखेर महिलांबद्दल केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याबद्दल माफी मागीतली आहे. राज्य महिला आयोगाचे अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी याबाबत ट्वीट करुन माहिती दिली आहे.

बाबा रामदेव ऊर्फ राम किसन यादव यांनी ठाणे येथील एका सार्वजानिक कार्यक्रमात महिलांसंबंधी अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन विधान केले होते. या वक्तव्याची राज्य महिला आयोगाने गंभीर दखल घेत बाबा रामदेव यादव यांना याबाबत आपला खुलासा दोन दिवसांच्या आत सादर करण्यासाठी नोटीस पाठवली होती. याबाबत त्यांचा खुलासा आयोग कार्यालयास प्राप्त झाला असून, केलेल्या वक्तव्याबाबत त्यांनी माफी मागितली आहे, असे चाकणकर यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटले आहे.

राज्य महिला आयोगाने पाठवलेल्या नोटीसला उत्तर देताना बाबा रामदेव म्हणतात की, राज्य महिला आयोग अधिनियम १९९३ नुसार आपण कोणताही गुन्हा केलेला नाही. आपण नेहमी विश्वस्तरावर महिला सशक्तीकरणासाठी प्रयत्न केले आहे. कारण महिलांना समाजात समानतेचा दर्जा मिळावा. आपण आत्तापर्यंत भारत सरकारच्या ‘बेटी बचाओ बेटी पढाओ’सारख्या योजनांना प्रोत्साहन मिळावा म्हणून विविध संघटनांसोबत मिळून काम केले आहे.

बाबा रामदेव म्हणाले, माझा कोणत्याही महिलेचा अपमान करण्याचा हेतू नव्हता. ठाणे येथील कार्यक्रम हा महिला सशक्तीकरणाचा होता. कार्यक्रमात मी बोलल्या काही सेकंदाचा व्हिडीओ सोशल मिडीयावर अधोरेखित केला गेला. माझ्या म्हणण्याचा गैरअर्थ काढण्यात आला. मी माझ्या संपूर्ण भाषणात मातृशक्तीचा गौरव केला. मी कपड्यांबद्दल केलेल्या विधानाचे अर्थ माझ्यासारख्या साध्या कपड्यात असे होते. तरी देखील माझ्या त्या विधानामुळे कुणाच्या भावना दुखावल्या असतील, तर मला त्याचा खेद आहे. माझ्या बोलण्याने दुखावलेल्या सर्वांची मी मनापासून माफी मागतो.