कळे (प्रतिनिधी) :  कोरोना संकटकाळात प्राणपणाला लावून कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांनी काम केले. एक वर्ष पूर्ण होत आले तरीही पूर्ण मानधन मिळालेले नाही. आजही हे कर्मचारी मानधनाच्या प्रतीक्षेत असून, आरोग्य विभागाचे उंबरठे झिजवत आहेत. जीव धोक्यात घालून पदरी निराशाच आल्याचे चित्र आहे. काहींची तर आत्मदहनाची मानसिकता झाली आहे. त्यामुळे आरोग्य विभागाकडून कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांची चेष्टाचा प्रकार पाहावयास मिळत आहे. यावरून शासन व प्रशासनाची उदासीनता दिसून येत आहे.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत कोविड काळजी केंद्रामध्ये जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्देशानुसार तहसीलदारांकडून कंत्राटी तत्त्वावरती डाटा ऑपरेटर, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, वैद्यकीय अधिकारी, आरोग्य सेविका आदी कर्मचाऱ्यांची १५ एप्रिल २०२१ ते ३१ ऑगस्ट २०२१. या कालावधीत नियुक्ती केली होती. या काळात अडीच महिन्याचे मानधन मिळाले; परंतु एक वर्ष पूर्ण होत आले तरीही दोन महिन्याचे मानधन अद्यापही मिळालेले नाही. कोरोनाची लाट ओसरून सर्व सुरळीत सुरु झाले. तरीही हक्काच्या मानधनासाठी आरोग्य विभागाचे उंबरठे झिजवावे लागत आहेत.

जिल्हा आरोग्यविभागाकडून चौकशी केली असता राज्य सरकारकडून निधी आला नसल्याचे सांगितले जात आहे. पालकमंत्री, आरोग्य राज्यमंत्री, जिल्हाधिकारी, जिल्हा आरोग्य अधिकारी यांना कंत्राटी कर्मचारी व आम आदमी पार्टी तर्फे निवेदने देण्यात आली आहेत. कोणताच निर्णय झालेला नसल्याने हक्कांच्या मानधनासाठी आरोग्य कर्मचाऱ्यांना झगडावे लागत आहे.

कोरोना संकट काळात आम्ही जीव धोक्यात घालून काम केले, ही आमची चूक झाली काय? आम्हाला कुटुंब नाही काय? ते चालवायचे कसे? आम्हाला कोणी वाली आहे की नाही? प्रशासनाला जाग येणार तर कधी ? असे अनेक प्रश्न कर्मचाऱ्यांकडून उपस्थित होत आहेत. कर्मचाऱ्यांकडून आत्मदहनाचा इशाराही देण्यात आला आहे. शासनाने व आरोग्य विभागाने याचा पाठपुरावा करुन निधी उपलब्ध करावा व प्रलंबित मानधान द्यावे, अशी मागणी कर्मचाऱ्यांकडून होत आहे.

कोविड केंद्रात काम करणाऱ्या ८५२ आरोग्य कर्मचाऱ्यांचे सुमारे १४ कोटी रूपये निधीची आवश्यकता आहे. यासाठी विविध स्तरावर शासनाकडे पाठपुरावा सुरू आहे. निधी मिळाल्यानंतर सर्वत्र वर्ग करण्यात येईल, असे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळी यांनी सांगितले.