इचलकरंजी (प्रतिनिधी) : ओबीसी समाजाचा ५२ टक्के वाटा असूनही मिळालेले आरक्षणही विविध ओबीसी जातींमध्ये विभागले गेले आहे. परिणामी, सत्तेत समान वाटा, सरकारी नोकरी, बँकेत उद्योग, व्यवसायासाठी कर्ज उपलब्ध होत नसल्याने ओबीसी समाजाचा आर्थिक व सामाजिक विकास खुंटला आहे. या अनुषंगाने कोल्हापूरात दि. १३ फेब्रुवारी रोजी शाहू स्मारक भवनमध्ये ओबीसी सक्षमीकरण परिषदेचे आयोजन केल्याचे श्रमिक ओबीसी संघटनेचे उपाध्यक्ष धोंडीबा कुंभार यांनी दिली आहे.

ओबीसी समाजाला संघटीत करुन समानता प्रस्थापित करण्याची या महासंघाची आग्रही भूमिका सत्तेतल्या राज्यकर्त्यांना दखल घ्यायला लावणारी ठरली आहे. त्यामुळेच आता पुन्हा एकदा ओबीसी आरक्षणाच्या सक्षमीकरणाचा मुद्दा घेवून श्रमिक ओबीसी महासंघाने ओबीसी समाज बांधवांना संघटीत होत लढा उभारुन तो यशस्वी करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. याच अनुषंगाने कोल्हापूरात शाहू स्मारक भवनमध्ये दिनांक १३ फेब्रुवारी रोजी ओबीसी सक्षमीकरण परिषदेचे आयोजन केले आहे.

या परिषदेला माजी न्यायमूर्ती बी.जी.कोळसे-पाटील हे आरक्षणा संदर्भातील घटनेतील तरतुदी आणि सद्यस्थितीतील त्याची गरज याविषयी मार्गदर्शन करणार आहेत. या परिषदेच्या अध्यक्षस्थानी ओबीसी समाज आणि आरक्षणाचे गाढे अभ्यासक श्रावण देवरे हे आहेत. तरी या परिषदेला ओबीसी समाजातील सर्व लोकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन श्रमिक ओबीसी महासंघाचे अध्यक्ष दिलीप लोखंडे, डॉ. आनंद गुरव, सुनील बारवाडे आणि पदाधिकाऱ्यांनी केले आहे.