टोप (प्रतिनिधी) :  करवीर तालुक्यातील जठारवाडी येथे गॅस्ट्रो सदृश्य आजाराची लागण झालेल्या रूग्णांची संख्या आज (शुक्रवार) ५० वर पोहचली असून यामुळे गावात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. तर यापैकी अनेक रूग्णांवर कोल्हापूर, कसबा बावडा, भुये येथील शासकीय रूग्णालयात तर काही रुग्णांना खासगी रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे.

जठारवाडी येथे काल (गुरुवार) गॅस्ट्रो सदृश्य आजाराची ३२ जणांना लागण झाली होती. तर आज ही संख्या ५० च्या वर पोहचली असल्याने गावात भितीचे वातावरण पसरले आहे. गावातील वाढती रूग्ण संख्या पाहता गावातील पिण्याचे पाणी हे प्रयोग शाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे. परंतु, त्याचा अहवाल अद्यापही मिळालेला नसल्याने परिसरात असंतोष निर्माण झाला आहे.