कुरुंदवाड (प्रतिनिधी) : कोरोनाला प्रतिबंध करायचा, तर सर्वांनी लसीचे दोन्ही डोस घेणे गरजेचे आहे. हा विषाणू वेगवेगळी रूपे धारण करत राहणार आहे. त्याच्याशी लढा द्यायचा, तर आपली रोकप्रतिकारकशक्ती चांगली असायला हवी. सर्वांनी लशीचे दोन डोस घेणे, हा सर्वोत्तम उपाय आहे, असे प्रतिपादन वैद्यकीय अधिकारी डॉ. जोगेश्वरी माणगावे यांनी केले आहे.

डॉ. माणगावे म्हणाले की, कोरोना संसर्ग नियंत्रणात आला आहे, आता लशीचा दुसरा डोस घेण्याची गरज काय, अशी सध्या अनेकांची मानसिकता आहे. त्यातूनच दुसरा डोस घेणे टाळले जात आहे. आपल्याला काही होणार नाही, हा भ्रम आहे. त्यामुळे कोरोना संसर्ग झाल्यास त्या आजाराची तीव्रता वाढू शकते, हे लक्षात घेतले पाहिजे. कोरोना संपला नाही. त्यामुळे दोन्ही डोस घ्या आणि दोन्ही डोस घेऊन ज्या नागरिकांना ९ महिने पूर्ण झाले आहेत, त्यांच्यासाठी नृसिंहवाडी प्राथमिक आरोग्य केंद्रात बूस्टर डोस दिले जात आहेत. याचा लाभ घ्यावा तसेच सोशल डिस्टन पाळा आणि रोज न चुकता मास्कचा वापर करा, असे आवाहनही त्यांनी केले आहे.