आता विनाचाचणी वाहन परवाना मिळणार 

0
275

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : वाहन चालकाला आरटीओमध्ये जाऊन प्रशिक्षण प्रमाणपत्रासोबत कागदपत्रे जमा केल्यानंतर आरटीओकडून त्याची चाचणी घेऊन नंतर त्याला शिकाऊ वाहन परवाना दिला जातो. परंतु आता प्रशिक्षित चालकाला विनाचाचणी वाहन परवाना मिळण्याचा निर्णय रस्ते वाहतूक मंत्रालयाने घेतला आहे, अशी माहिती परिवहन आयुक्त अविनाश ढाकणे यांनी दिली आहे. 

रस्ते वाहतूक मंत्रालयाने नव्याने प्रशिक्षण केंद्रांसाठी मसुदा तयार केला आहे. याबाबतची अधिसूचना जारी केली आहे. याबाबत कोणत्या राज्याला काही हरकती   असल्यास ३० दिवसांच्या आत सूचना द्याव्या लागणार आहेत. दरम्यान, नव्याने वाहन प्रशिक्षण केंद्रे स्थापन करण्यासाठी १ किंवा २ एकर जागा असणे आवश्यक आहे. या केंद्रात सर्वात महत्वाचे वाहतूक नियम शकवण्याची साधने असणे आवश्यक आहे. तसेच हलकी वाहने, आभासी प्रशिक्षण चाचणी यंत्रणा, संगणक, मिल्टिमीडिया प्रोजेक्टर, अवजड आणि स्वतंत्र चाचणी पथ, पार्किंग व्यवस्था अशा अनेक सुविधा केंद्राच्या अधिसूचनेनुसार असणे गरजेचे आहे. या प्रशिक्षण केंद्रातून प्रशिक्षण घेतल्यानंतर प्रशिक्षित चालकाला लगेच वाहन परवाना मिळेल आणि पुन्हा त्या केंद्रात किंवा आरटीओमध्ये जाण्याची गरज भासणार नाही.

दरम्यान, खासगी वाहन प्रशिक्षण केंद्रातून चालकाला सर्वप्रथम २१ दिवसाचे प्रशिक्षण दिले जाते. त्यानंतर चालकाला आरटीओमध्ये जाऊन प्रशिक्षण प्रमाणपत्रासोबत कागदपत्रे जमा केल्यानंतर आरटीओकडून त्याची चाचणी घेऊन नंतर त्याला शिकाऊ वाहन परवाना दिला जातो. परंतु या नियमानुसार वाहन परवाना मिळणे सुलभ होणार आहे.