‘अब आँखो में आँखे डालकर बात होगी’, पण कधी..? : शिवसेनेचा मोदींना सवाल  

0
224

मुंबई (प्रतिनिधी) : अरुणाचल प्रदेशात चीनने वसवलेल्या गावावरून नवा वाद होण्याची चिन्हं आहेत. चीनच्या या धाडसी निर्णयावर विरोधकांकडून कारवाई करण्याची मागणी मोदी सरकारकडे केली जात आहे.  यावरून शिवसेनेनेही ‘सामना’च्या अग्रलेखातून पंतप्रधान मोदी यांना त्यांच्या ‘अब आँखो में आँखे डालकर बात होगी’  या विधानांची आठवण करून देत टोला लगावला आहे.

अरुणाचल प्रदेशातून येणारी चीनच्या नव्या घुसखोरीची बातमी धक्कादायक व हिंदुस्थानच्या चिंतेत भर घालणारी आहे. हिंदुस्थानी हद्दीत घुसून अरुणाचल प्रदेशातील सीमा भागात चीनने एक अख्खे गाव वसवले आहे. हे सगळे एक रात्रीत घडले नाही. मग आता प्रश्न असा पडतो की, आपल्या हद्दीत चीन नवीन गाव उभारत असताना आपले प्रधान सेवक, चौकीदार वगैरे म्हणवणारे शक्तिशाली सरकार काय करत होते ? एखाद्याने आपल्या गावात साधे एका घराचे बांधकाम करायचे ठरवले तरी दगडविटा, सिमेंट, स्टील, वाळूचे ढिगारे आणावे लागतात. मालवाहतुकीची वर्दळ सुरू होते आणि कोणाचे बांधकाम सुरू आहे. याचा बोभाटा गावभर होतो. इथे तर एकदोन घरे नव्हे, अख्खे गावच उभे राहिले, पण ना हाक ना बोंब! कितीतरी इमारती उभ्या राहिल्या, पक्क्या घरांची बांधकामे झाली. बांधकामाचे साहित्य येऊन पडत होते, पण आपल्या केंद्रीय सरकारला याची कानोकान खबर लागली नाही, अशी शंका शिवसेनेनं उपस्थित केली आहे.