मुंबई  (प्रतिनिधी) :  कमी  निधी मिळत असल्याने विकासकामे करता येत नसल्याची तक्रार आता आमदारांना करता येणार नाही. कारण राज्यातील आमदारांच्या स्थानिक विकास निधीत १ कोटी रूपयांची वाढ करण्याचा  महत्त्वाचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. विधानसभा  आमदारांबरोबर विधानपरिषदेच्या आमदारांच्या निधीत ही वाढ करण्यात येणार आहे.

सध्या आमदारांना ३ कोटी रुपये  विकासनिधी  मिळतो. परंतु, मतदारसंघाची भौगोलिक रचना लक्षात घेता हा निधी कमी पडतो. त्यामुळे विकासकामे करताना मर्यादा येतात. आता १ कोटीची वाढ केल्याने आमदारांना ४ कोटींचा निधी मिळणार आहे. त्यामुळे आमदारांना मतदारसंघातील विकासकामे करताना येणाऱ्या अडचणी कमी होण्यास मदत होणार आहे.  आमदार निधीतून करण्यात येणाऱ्या कामात शौचालयांचे बांधकाम,  व्यायामशाळांचे बांधकाम,  स्मशानभूमीची कामे,  बसथांबा बांधकाम, अंगणवाडी, रस्ते या कामांचा समावेश असतो. परंतु निधी कमी असल्याची तक्रार सतत आमदारांकडून होत असते. त्यामुळेच राज्य सरकारने आमदारांच्या स्थानिक निधीमध्ये १ कोटी रुपयांची वाढ करून ती ४ कोटी करण्याचा निर्णय घेतला आहे. पण, वाढीव  निधी मिळाल्यानंतरही मतदारसंघातील विकासकामे होणार आहेत का ?  हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.