औरंगाबाद (प्रतिनिधी) : राजकारणात कधी काहीही होऊ शकते. परंतु आम्ही एक सक्षम विरोधी पक्षाची भूमिका पार पाडत आहोत. तसेच राज्यात जी अनैसर्गिक आघाडी तयार झाली आहे,  ती फार काळ टिकत नाही,  हे मुख्यमंत्र्यांच्या देखील लक्षात आले असेल. म्हणून मुख्यमंत्री यांनी मनातली भावना बोलून दाखवली, अशी प्रतिक्रिया विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.

आज (शुक्रवार) औरंगाबाद जिल्हा परिषदेच्या इमारतीच्या उद्घाटनप्रसंगी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाषणाची सुरुवात करताना व्यासपीठावरच्या उपस्थित मान्यवरांना संबोधताना आजी-माजी सहकाऱ्यांचा उल्लेख केला. मात्र, यावेळी मागे बघून त्यांनी भावी सहकारी म्हणून देखील संदर्भ दिला. त्यामुळे नेमका मुख्यमंत्र्यांचा रोख कुणाकडे आहे? याविषयी चर्चा सुरू झाली.  यावर फडणवीस यांनी सूचक प्रतिक्रिया दिली आहे.

यावेळी व्यासपीठावर केंद्रीय मंत्री आणि भाजप खासदार रावसाहेब दानवे आणि केंद्रीय राज्यमंत्री भागवत कराड उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणाच्या सुरुवातीलाच केलेल्या विधानामुळे तर्क-वितर्क सुरू झाले आहेत.