मुंबई (प्रतिनिधी) : आता कोरोना प्रतिबंधक लस घेण्यासाठी कोणत्याही खासगी किंवा सरकारी कोरोना सेंटरवर किंवा रुग्णालयात जाण्याची गरज नाही. ४५ वर्षांवरील व्यक्तीला तो काम करीत असलेल्या खाजगी किंवा सरकारी ऑफिसमध्येच लस मिळणार आहे. कामाच्या ठिकाणी कोरोना लसीकरण राबवण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. याबाबत अधिसूचनाही जारी करण्यात आली आहे.

खासगी आणि सरकारी कार्यालयात कोरोना लसीकरण केलं जाणार आहे. ११ एप्रिलपासून ही सेवा उपलब्ध करून दिली जाईल. यासाठी आवश्यक ती तयारी करण्याच्या सूचना केंद्र सरकारने राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना दिल्या आहेत. नियमानुसार ४५ पेक्षा जास्त वयाच्या व्यक्तींना कोरोना लस दिली जाते आहे. त्यामुळे इथंसुद्धा याच निकषात बसणाऱ्या व्यक्तींना कोरोना लस मिळेल. ही लस फक्त संबंधित ऑफिसमधील कर्मचाऱ्यांनाच मिळेल. कर्मचाऱ्यांचे नातेवाईकांसह ऑफिसबाहेरील इतर कुणालाही ही लस मिळणार नाही, असं स्पष्ट करण्यात आलं आहे.  केंद्रीय आरोग्य सचिवांनी जारी केलेल्या या सूचनेनुसार एकावेळी फक्त १०० लोकांचं लसीकरण केलं जाईल.