…आता तरी नारायण राणेंना सुखाने झोप लागेल

0
86

कोल्हापूर (प्रतिनिधी) : सुरक्षा व्यवस्थेच्या मुद्द्यावरुन नारायण राणे यांनी राज्य सरकारला हिणवले होते. राज्य सरकारने सुरक्षा व्यवस्था कमी केली असली, तरी केंद्राने सुरक्षा व्यवस्था पुरवली आहे, त्यामुळे आता तरी राणेंना सुखाने झोप लागेल, असा चिमटा  राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी घेतला. कोल्हापूर येथील पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

ते म्हणाले, राज्यघटनेने राज्यसरकारांना कायदा आणि सुव्यवस्थेबाबत निर्णय घेण्याचा अधिकार बहाल केला आहे. पण राज्यातल्या काही नेत्यांची सुरक्षा काढून घेतल्यानंतर केंद्र सरकारने हस्तक्षेप करत नेत्यांना सुरक्षा दिली. त्याबद्दल आमची तक्रार नाही. पण हा अधिकार राज्य सरकारचा आहे. त्यात केंद्राने हस्तक्षेप करणे बरोबर नाही. सुरक्षा देण्याची आवश्‍यकता कोणाला आहे? याचा अहवाल पोलिस राज्य सरकारला देत असतात. संभाव्य धोका ओळखूनच ही सुरक्षा दिली जाते. यामध्ये केंद्र सरकारने केलेला हस्तक्षेप चुकीचा आहे.

राजकीय नेत्यांना पुरवली जाणारी सुरक्षा हा नेहमीच वादाचा विषय बनतो. आताही राज्य शासनाने देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील, नारायण राणे, राज ठाकरे आदी नेत्यांची सुरक्षा व्यवस्था कमी केली आहे. यावरून वादाला तोंड फुटले आहे. मात्र राज्य शासनाचा निर्णय डावलून तेथे केंद्र शासनाने हस्तक्षेप करणे ही पद्धत योग्य नाही, अशी टिप्पणीही त्यांनी केली. माझीही सुरक्षा व्यवस्था कमी केली होती, पण त्यावर मी काहीही प्रतिक्रिया दिली नव्हती.