हिमाचल प्रदेश (वृत्तसंस्था) : कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी मास्क लावणे बंधनकारक आहे. मात्र, सर्रास नागरिकांनी मास्क लावणे बंद केले आहे. सार्वजनिक ठिकाणी मास्कचा वापर करताना दिसत नाही. ही बाब लक्षात घेता हिमाचल प्रदेश सरकारने सार्वजनिक ठिकाणी विनामास्क आढळल्यास थेट अटक करण्याचे आदेशच पोलिसांना दिले आहेत, अशी माहिती सिरमौरच्या पोलीस अधीक्षक यांनी दिली.

देशात दिल्लीसह काही राज्यात कोरोनाचा संसर्ग वाढू लागला आहे. नागरिकांकडून  नियम पाळले जात नाहीत. त्यामुळे हिमाचल सरकारने कोणतीही व्यक्ती सार्वजनिक ठिकाणी विनामास्क आढळल्यास वॉरंटशिवाय अटक करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच या प्रकरणात ८ दिवसांपर्यंत तुरुंगवास किंवा ५ हजार रुपयांचा दंड आकारण्यात येणार आहे. दरम्यान, कोरोनाची दुसरी लाट येण्याच्या शक्यतेने केंद्र सरकारसह राज्य सरकारांनी अनेक उपाययोजना करण्यास सुरूवात केली आहे. सर्व प्रकारची सज्जता ठेवण्यात आली आहे. तर काही राज्यांनी कडक धोरण स्वीकारल्याचे दिसते.