पुणे (प्रतिनिधी) : पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांचा गृहपाठ बंद करण्याचा राज्य सरकारचा विचार आहे. लवकरच तज्ज्ञांशी चर्चा करुन गृहपाठ बंदीवर निर्णय घेणार असल्याची माहिती शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी दिली. त्यामुळे राज्यातील विद्यार्थी आणि पालकांसाठी ही आनंदाची बातमी ठरणार आहे.

केसरकर म्हणाले, माझे वैयक्तिक मत आहे की, मुलांवर अभ्यासाचे ओझे देऊ नये. मुलांच्या मेंदूचा विकास झाला पाहिजे. गृहपाठ ही शिक्षकांसाठी पळवाट असता कामा नये. शिक्षकांनी  विद्यार्थ्यांनी कमी वेळात पटकन समजेल असे शिकवावे, जेणेकरून त्यांना गृहपाठाची गरज भासणार नाही; परंतु हा मोठा निर्णय असून,याबद्दल शिक्षक संघटना, संस्थाचालक त्यांच्याशी बोलणार आणि मग त्यावर निर्णय घेण्यात येणार आहे.

राज्य सरकारकडून जर असा निर्णय घेण्यात आला, तर घरी येऊन पुन्हा अभ्यास करण्याचा विद्यार्थ्यांवरचा ताण कमी होणार आहे. हा निर्णय घेण्यामागे विद्यार्थ्यांना खेळण्यासाठी जास्त वेळ मिळावा त्याद्वारे त्याच्या कलागुणांना वाव मिळावा हा हेतू आहे. आगामी शालेय शिक्षण वर्षात हा निर्णय घेण्याची शक्यता आहे. या निर्णयामुळे मुलांच्या पाठीवरील ओझे कमी होणार आहे.