आता बंटी बबलीची जोडी मीडियात धुमाकूळ घालतीय : सुरेश खोपडे

0
42

मुंबई (प्रतिनिधी) : पुण्याच्या माजी पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांचा फोन टॅपिंग प्रकरणाशी संबंध असल्याचे बोलले जात आहे. यावरून माजी पोलीस अधिकारी सुरेश खोपडे यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि रश्मी शुक्ला यांना ‘बंटी बबली’ असे म्हणत निशाणा साधला आहे. याबाबत खोपडे यांनी फेसबुकवर पोस्ट टाकली आहे.

या पोस्टमध्ये म्हटले आहे की, गृहमंत्र्यांनी एका कनिष्ठ अधिकाऱ्याला शंभर कोटी वसूल करण्याचा आदेश दिला होता, असा आरोप पोलिस आयुक्तांनी केला ही तशी गंभीर घटना आहे. विरोधी पक्ष नेत्याने दखल घेणं रास्त आहे. पण त्याला काही मर्यादा? हे महाभाग मीडियाच्या माध्यमातून स्वतःच तपासी अंमलदार व स्वतःच न्यायाधीश बनून निवाडा करीत आहेत. आता त्याच्यासोबत पूर्वी महाराष्ट्राच्या गुप्त वार्ता विभागात काम केलेली रश्मी नावाची आयपीएस अधिकारी आली आहे. काल पासून ही बंटी बबलीची जोडी मीडियात धुमाकूळ घालतीय. 

ही बबली सात वर्षेपेक्षा जास्त काळ नागपूरला होती. बंटीला राखी बांधत बबलीचं सुर जुळले. राखीच्या मोबदल्यात तिला पुण्याची कोतवाली, जहागिरी मिळाली. तिच्या सारा वसुलीच्या सुरस कथा पोलीस स्टेशनमधून आज ही ऐकायला मिळतात. बहुमत मिळालेल्या बंटीला महाराष्ट्राची पेशव्यांची गादी मिळावी, म्हणून बबलीने महाराष्ट्राचा सगळा गुप्त वार्ता विभाग कामाला लावला आहे, असे सुरेश खोपडे यांनी म्हटले आहे.