मुंबई (प्रतिनिधी) : अभिनेता किरण माने यांची स्टार प्रवाह वरील ‘मुलगी झाली हो’ या मालिकेतून हकालपट्टी केल्यानंतर माने यांच्या पत्नी ललिता किरण माने यांनी महिला आयोगाकडे तक्रार केली आहे. त्यानंतर मालिकेच्या निर्मात्या सुझाना घई यांना नोटीस बजावण्यात आली आहे.

किरण माने ‘मुलगी झाली हो’ या मालिकेतून मिळणाऱ्या उत्पन्नावर कुटुंबाचा उदरनिर्वाह करत आहे. पण पुरोगामी विचारांचे असून विविध माध्यमातून वैचारिक भूमिका मांडत, लिहित असल्यामुळे त्यांना कोणतीही पूर्व संधी व सूचना न देता त्यांना मालिकेतून काढून टाकण्यात आले आहे. त्यामुळे कुटुंब आर्थिक संकटात सापडून मानसिक तणावात आहे, असे या तक्रार अर्जात म्हटले आहे.

या तक्रारीनंतर महिला आयोगाने मालिकेच्या निर्मात्या आणि पॅनारोमा एंटरटेनमेंट प्रमुख सुझाना घाई यांना नोटीस पाठवली आहे. या नोटीसच्या अंतर्गत त्यांना महिला आयोगाच्या ईमेल आयडी वरून लेखी खुलासा पाठवण्यास सांगितला आहे.

दरम्यान, माने याची सेटवरची वर्तणूक नीट नसल्यामुळेच त्याला काढण्यात आले आहे. याआधी माने याला वार्निंग देऊनही त्यांनी  आपली वर्तणूक सुधारली नसल्याचा दावा मालिकेच्या निर्मात्यांनी आणि सहकलाकारांनी केला आहे.