मुंबई (प्रतिनिधी) : शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाच्या जागेवरून वादविवाद झाले. आता यावरून नवा वाद होण्याची शक्यता आहे. दादरच्या शिवाजी पार्कमधील जुन्या महापौर बंगल्यात बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक उभारण्यात येणार आहे. स्मारकाचे भूमिपूजन आज राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते होणार आहे. मात्र, या कार्यक्रमाला राज ठाकरे यांच्यासह सर्वपक्षीय नेत्यांना आमंत्रण दिलेले नाही. यावरून मनसेने शिवसेनेवर टीका केली आहे.

स्वर्गीय माननीय बाळासाहेबांचे विचार खऱ्या अर्थाने पुढे नेण्याचे काम हे राजसाहेबच करत आहेत, अशीच मराठी माणसांची भावना आहे. आणि तीच भावना महत्त्वाची आहे. बाकी भूमिपूजन कोण करतंय याला महत्व नाही, अशी टीका मनसे नेते संदीप देशपांडे यांनी केली आहे.  

तर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी या कार्यक्रमाला विरोधी पक्षाला आमंत्रण न दिल्याने नाराजी व्यक्त केली आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी बाळासाहेबांच्या स्मारकासाठी प्रचंड मेहनत घेतली आहे. राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांना या भूमिपूजनाचे आमंत्रण द्यायला पाहिजे होते, असे त्यांनी म्हटले आहे.