कोल्हापूर (प्रतिनिधी) : मागील पाच वर्षांपासून फरार असलेल्या राजस्थानमधील कुविख्यात गुंडास काल (गुरुवार) मध्यरात्री सरनोबतवाडी येथे अटक करण्यात राजस्थान पोलिसांना यश आले. पपला गुर्जर असे त्याचे नाव असून त्याच्यावर राजस्थानमध्ये अनके गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. राजस्थान पोलीस तुरुंग फोडून पसार झालेल्या पपलाच्या शोधात काही वर्षांपासून शोधात होते. या शोधमोहिमेत राजस्थान पोलिसांना कोल्हापूर पोलिसांनी मदत केली.

पपला गुर्जर हा नामचीन गुन्हेगार असून राजस्थानमधील अल्वर तुरुंग फोडून तो पसार झाला होता. त्याला शोधण्यासाठी राजस्थान पोलिसांनी मोहीम राबवली. त्याला पकडून देणाऱ्यास पाच लाखांचे बक्षीस जाहीर करण्यात आले होते. सुमारे पाच वर्षांपासून तो पोलिसांना गुंगारा देत होता. तो कोल्हापुरातील सरनोबतवाडी येथे असल्याची माहिती मिळाल्यावर राजस्थान पोलिसांनी आठ दिवसांपासून त्याच्यावर पाळत ठेवली.

स्थानिक राजस्थानी नागरिकांकडून खातरजमा केल्यावर पोलिसांनी गुरुवारी रात्री तो राहत असलेल्या सरनोबतवाडीतील घरावर छापा टाकला. पोलिसांनी आपल्याला घेरल्याचे लक्षात येताच त्याने इमारतीवरून पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र यात तो जखमी झाला. पोलिसांनी त्याला जखमी अवस्थेत ताब्यात घेतले. त्याचप्रमाणे त्याच्या एका साथीदारासही ताब्यात घेण्यात आले.