मुंबई (प्रतिनिधी) : शिवसेनेचे ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांच्यानंतर आता राजन साळवी यांना लाचलुचपत विभागाकडून नोटीस देण्यात आली आहे. या नोटिसीमध्ये मालमत्तेसंदर्भात उल्लेख केला आहे. पाच तारखेला अलिबाग येथील अँटी करप्शन कार्यालयात हजर राहण्याचा नोटीसमध्ये उल्लेख केला आहे. 

या आधी बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी लाचलुचपत विभागाने वैभव नाईक यांना नोटीस पाठवली आहे. त्यांची सध्या चौकशी सुरू आहे. वैभव नाईक यांनी यापूर्वीच अँटी करप्शन कार्यालय रत्नागिरीला मेल करत यापूर्वीच वेळ मागून घेतला आहे.

वैभव नाईक यांनी त्यानंतर कुडाळ येथील अँटी करप्शन कार्यालयावर मोर्चा देखील काढला होता. त्यानंतर नीलेश राणे यांनी काढलेल्या संविधान बचाव रॅलीमध्ये प्रवीण दरेकर, प्रसाद लाड हे नेते देखील सहभागी झाले होते. यावेळी वैभव नाईक यांच्यावर सरकार दबाव आणू पाहत आहे, असा आरोप देखील ठाकरे गटाकडून करण्यात आला होता.

या साऱ्या घडामोडी घडत असताना आता राजन साळवी यांना देखील अँटी करप्शनची नोटीस आली आहे. या नोटिशीमध्ये त्यांना ५ डिसेंबर रोजी अलिबाग येथील कार्यालयात हजर राहण्यास सांगितले आहे. ठाकरे गटातील रत्नागिरी जिल्ह्यातल्या लांजा-राजापूर-साखरपा या विधानसभा मतदारसंघातील राजन साळवी हे आमदार आहेत. मागच्या काही दिवसांपासून ते शिंदे गटात जाणार, अशी चर्चा देखील सुरू होती; पण राजन साळवी यांनी मात्र या चर्चा फेटाळून लावल्या होत्या.