मुंबई (प्रतिनिधी) : मी ठामपणे सांगतो, अशी काही गुप्त भेट वगैरे अजिबात झालेली नाही. आता तरी रहस्य कथेचा शेवट करा. अफवांची धुळवड थांबवा. हाती काहीच लागणार नाही, असे शिवसेनेचे नेते व खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे.  

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यामध्ये अहमदाबादमध्ये भेट झाल्याचे वृत्त समोर आले आहे. त्यानंतर  राज्यातील राजकीय वर्तुळात उलटसुलट  चर्चांना सुरूवात झाली आहे. यावर राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

संजय राऊत म्हणाले की, काही गोष्टी वेळेबरोबर स्पष्ट झाल्या पाहिजे,  नाहीतर भ्रम निर्माण होतो. मी विश्वासाने सांगू शकतो की, शरद पवार आणि अमित शहा यांच्यात अहमदाबाद किंवा कुठही गुप्त बैठक झालेली नाही.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसने या भेटीबाबतचे वृत्त फेटाळून लावले आहे. तर गृहमंत्री अमित शहा यांनी मात्र सर्वच गोष्टी सार्वजनिकपणे केल्या जात नाहीत, असे म्हणत या भेटीचे गूढ वाढवले आहे.