मुंबई (प्रतिनिधी) : महाराष्ट्रात लॉकडाऊनबाबत निर्णय घेण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज (शनिवार) संध्याकाळी सर्वपक्षीयांची बैठक बोलावली आहे. या बैठकीत संपूर्ण राज्यातील लॉकडाउन संदर्भात महाराष्ट्रासाठी एकच निर्णय घेण्यात येईल. प्रत्येक ठिकाणी वेगळा निर्णय घेऊन चालणार नाही,  असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटले आहे. तसेच दुकाने उघडण्याच्या व्यापाऱ्यांच्या भूमिकेबद्दलही आज किंवा उद्या निर्णय होईल, अशी देखील माहिती पवार यांनी दिली आहे.

दरम्यान, कोरोनाची साखळी तोडण्यासाठी लागू केलेल्या निर्बंधावरून संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. या पार्श्वभूमीवर सर्वपक्षीय नेत्यांच्या बैठकीत चर्चा करण्यात येणार आहे. तसेच दहावी आणि बारावीची परीक्षा तसेच निर्बंध शिथिल करायचे की अधिक कठोर करायचे, यावर विचारविनिमय होईल. रुग्णसंख्या कमी होत नाही, त्यामुळे निर्बंध अधिक कडक करण्याचा सल्ला कृती दल व तज्ज्ञांनी सरकारला दिला आहे.