मुंबई  (प्रतिनिधी) :  राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांची प्रकृती बिघडल्याने त्यांच्यावर गेल्या तीन दिवसांपासून मुंबईतील बॉम्बे रुग्णालयात  उपचार सुरु आहेत. परंतु, त्यांच्यावर नेमके कोणते उपचार सुरु आहेत,  याबाबतचा तपशील समजू शकलेला नाही. डॉ. गौतम भंसाळी यांच्या निरीक्षणाखाली त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी हसन मुश्रीफ यांच्या कुटुंबावर १२७  कोटींच्या घोटाळ्याचा आरोप केल्यानंतर राज्यात खळबळ उडाली होती. त्यानंतर या आरोपांचे खंडन करून मुश्रीफ यांनी सोमय्या यांच्यावर १००  कोटी रुपयांचा दावा दाखल करण्याचा इशारा दिला  आहे. तर हसन मुश्रीफ यांनी नुकतीच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेऊन आपली बाजू मांडली.

दरम्यान, किरीट सोमय्यांविरोधात कोल्हापुरात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरून निदर्शने केली होती. तसेच सोमय्यांविरोधात दावा दाखल करण्यासाठी लागणाऱ्या रक्कमेसाठी कार्यकर्त्यांनी निधी गोळा करण्यास सुरूवात केली आहे. तर दुसरीकडे सोमय्या यांनी सोमवारी (दि.२०) कोल्हापुरात येण्याचा निर्धार केला आहे. यावेळी ते कागलमधील घोरपडे साखर कारखान्याची पाहणी करणार आहेत. पण मुश्रीफ यांच्या कार्यकर्त्यांचा सोमय्या यांच्याविरोधातील असंतोष पाहता कारखानास्थळी वातावरण तणावपूर्ण होण्याची शक्यता आहे.