म्हैसाळमधील ९ जणांची आत्महत्या नसून हत्याकांडच

0
68

सांगली (प्रतिनिधी) : मिरज तालुक्यातील म्हैसाळ येथील एकाच कुटुंबातील ९ जणांनी सामूहिक आत्महत्या प्रकरणाला वेगळे वळण लागले आहे. ‘त्या’ ९ जणांची आत्महत्या नसून त्यांचे हत्याकांड झाल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. दोघांनी या लोकांच्या जेवणात विष घालून त्यांना मारल्याचे तपासात उघड झाले आहे. या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली असल्याची माहिती सांगलीचे पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम यांनी दिली.

९ जणांनी सामूहिक आत्महत्या केल्याने संपूर्ण जिल्हा हादरला होता. ही आत्महत्या सावकारी कर्जापोटीच झाल्याचे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले होते. या प्रकरणी मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यात तब्बल २५ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी मांत्रिक अब्बास मोहम्मद अली बागवान (वय ४८, रा. सर्वदेनगर सोलापूर) आणि धीरज चंद्रकांत सुरवशे (वय ३९ रा. वसंत-विहार ध्यानेश्वरी, सोलापूर) यांना अटक केली आहे.

मयत डॉ. माणिक बल्लापा व्हनमोरे व पोपट यलाप्पा व्हनमोरे यांच्या गुप्त धनाबाबत एका अनोळखीसोबत भेटी होत होत्या. त्यासाठी त्यांनी वेळोवेळी समोरच्या व्यक्तीस पैसे दिले होते. तसेच ती व्यक्ती वरचेवर रात्रीच्या वेळी म्हैसाळ येथील वनमोरे यांचे घरी येत होती अशी खबर मिळाली होती. त्यानुसार सत्यता पडताळण्यासाठी पोलिसांची पथके रवाना करण्यात आली होती. उपलब्ध तांत्रिक माहितीच्या आधारे डॉ. व्हनमोरे यांचे घरी येणाऱ्या व्यक्तीबाबत सखोल तपास केल्यानंतर ही व्यक्ती सोलापूर जिल्ह्यातील असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार अब्बास आणि धीरजला सोलापुरातून ताब्यात घेण्यात आले. १९ जून रोजी दोघे संशयित म्हैसाळमधून येवून गेल्याचे चौकशीत निष्पन्न झाले आहे.