कळे (प्रतिनिधी) : पन्हाळा तालुक्यातील कळे, बाजारभोगाव बाजारपेठांमध्ये महापुरामुळे येथील व्यावसायिक, नागरीकांचे प्रचंड नुकसान झाले होते. तसेच धामणी खोऱ्यातील भूस्खलनामुळे नुकसान झालेल्या भागांची आ. पी. एन. पाटील यांनी आज (रविवार) पाहणी  केली. तसेच नुकसानभरपाईपासून कोणीही वंचित राहणार नाही यासाठी प्रयत्नशिल असल्याचे त्यांनी आ. पाटील यांनी सांगितले. 

कळे, बाजारभोगावमध्ये महापुरामुळे अनेक दुकानांचे नुकसान झाले.  धामणी खोऱ्यातील पणुत्रे, आंबर्डे, हरपवडे, निवाचीवाडी आणि राधानगरी तालुक्यातील गवशी, पात्रेवाडी आदी गावांमध्ये पुरामुळे आणि भूस्खलनामुळे अतोनात नुकसान झाले. यावेळी आ. पाटील यांनी पूरग्रस्त व्यावसायिक आणि शेतकऱ्यांची भेट घेतली.

यावेळी पूरग्रस्त दुकाने, व्यवसाय, पडझड झालेली घरे आणि शेतीच्या नुकसानीचे पारदर्शक पद्धतीने पंचनामे करावेत. पूरग्रस्तांना जास्तीत जास्त मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्याच्या सूचना महसूल विभागाला केल्या. तसेच महापुरामध्ये विद्युततारा तुटून वीजखांब आणि ट्रान्सफार्मरचे तातडीने पंचनामे करून ते पूर्ववत करण्याच्या सूचनाही महावितरणच्या अधिकाऱ्यांना देण्यात आल्या.

यावेळी गोकुळचे संचालक बाळासाहेब खाडे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष जयसिंगराव हिर्डेकर, बाजार समितीचे संचालक शशिकांत आडनाईक, अॅड. शाहू काटकर, अप्पर तहसिलदार सुधीर सोनवणे, मंडलाधिकारी बी.एस.खोत, माजी जि.प.सदस्य बाळासाहेब मोळे, माजी पं.स. सदस्य विलास पाटील, सरपंच, ग्रामसेवक, ग्रामस्थ उपस्थित होते.