जालना (प्रतिनिधी) : राज्यात कोरोनाचे रूग्ण वाढू लागले असले तरी जोपर्यंत ऑक्सिजनची गरज वाढत नाही किंवा रुग्णसंख्या दवाखान्यात जास्त वाढत नाही तोपर्यंत आज लावलेल्या निर्बंधांपेक्षा आणखी निर्बंध वाढवण्याची गरज वाटत नाही, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटले आहे. ते जालन्यात आज (रविवार) पत्रकारांशी बोलत होते.

ते पुढे म्हणाले की, नागरिकांनी काळजी घेऊन नियमांचे पालन करावे. साधी लक्षणं असल्यास घरीच उपचार घ्या, मास्कचा वापर करा. गरम पाणी आणि व्यायामही करा. निर्बंध पाळा, गर्दी टाळा, लसीकरण करा, असे आवाहन त्यांनी केले. ५ पेक्षा जास्त व्यक्तींना जमा होता येणार नाही. गर्दी टाळणे हाच महत्त्वाचा भाग असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

दिवसाला ४० ते ४५ हजार रुग्णांची वाढ होत असल्याने काही निर्बंध लावणे क्रमप्राप्त आहे. आता दिवसा जमावबंदी तर रात्री नाईट कर्फ्यु, शाळा कॉलेजेस पूर्णतः बंद करण्याच्या सूचना दिल्या असल्या तरी परीक्षा वेळेवरच होतील असेही टोपे यांनी यावेळी सांगितले.