मास्क नाही तर बँकसेवाही नाही : आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी

0
37

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोरोना संसर्ग रोखण्यासाठी ‘नो मास्क-नो एन्ट्री’ हा उपक्रम शहरात प्रभावीपणे राबविण्यात येत असून आता शहरातील  सर्वच बँकांमध्येही ‘मास्क नाही-बँकसेवाही नाही’, हा उपक्रम कठोरपणे   राबवावा, असे आवाहन महापालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी केले.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महापालिका क्षेत्रातील सर्व बँकर्सची विशेष बैठक आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यानी आज (मंगळवार) निवडणूक कार्यालयामधून व्हीसीव्दारे घेतली. त्यावेळी ते बोलत होते. या बैठकीत पंतप्रधान पथविक्रेता आत्मनिर्भर निधी योजनेच्या अंमलबजावणीचा आढावाही आयुक्तांनी घेतला. या बैठकीस जिल्हा अग्रणी प्रबंधक राहुल माने, इस्टेट ऑफिसर सचिन जाधव, कौशल्य विकास विभागाचे व्यवस्थापक निवास कोळी, राष्ट्रीय नागरी उपजिविका अभियानाचे सामाजिक विकास व्यवस्थापक रोहित सोनुले, विजय तळेकर यांच्यासह सर्व बँकांच्या प्रतिनिधीनी सहभाग घेतला. शहरातील बँकांनी आता बँकेत येणाऱ्या ग्राहकांसाठी नो मास्क, नो एन्ट्री या उपक्रमाची काटेकोर अंमलबजावणी करावी तसेच सामाजिक अंतराचेही पालन करण्यास प्राधान्य द्यावे, अशी सूचना करुन आयुक्त डॉ. मल्लीनाथ कलशेट्टी म्हणाले की, ‘मास्क नाही-बँकसेवाही नाही, हा उपक्रम कोरोनाची साखळी तोडण्यासाठी उपयुक्त ठरणार असल्याने बँक अधिकाऱ्यांनी या उपक्रमावर अधिक भर द्यावा, तसे फलकही बँकेच्या प्रवेशव्दाराजवळ ठळकपणे लावावेत. याबरोबरच मास्क वापरणे, वारंवार हात धुणे, सुरक्षित अंतर राखणे  या बाबींचे कोरोनाची साखळी तोडण्यासाठी असलेले महत्व बँक ग्राहकांना समजावून सांगावे, असे आवाहनही त्यांनी केले.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बँकेमध्ये ग्राहकांची गर्दी होणार नाही , याची दक्षता बँक अधिकाऱ्यांनी घ्यावी, अशी सूचना करुन आयुक्त डॉ. मल्लीनाथ कलशेट्टी म्हणाले, यासाठी बँक ग्राहकांचे काम प्राधान्यक्रमाने करावे, आगामी सणासुदीच्या दिवसात ग्राहकांची गर्दी होणार नाही, यादृष्टीने आतापासूनच नियोजन करावे, सर्व बँक अधिकारी, कर्मचाऱ्यांनीही मास्क वापरणे, सुरक्षित अंतर राखणे, वारंवार हात धुणे, आवश्यकतेनुसार सॅनिटायझेशन करणे याबाबीकडे अधिक लक्ष देणे महत्वाचे असल्याचेही ते म्हणाले.

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here