मुंबई (प्रतिनिधी) : सर्व आरोपींनी समान हेतूने बेकायदेशीर कृत्य करण्यास सहमती दर्शविली हे सिद्ध करण्यासाठी कोणताही ऑन-रेकॉर्ड सकारात्मक पुरावा न्यायालयासमोर सादर केला गेला नाही, असे निरीक्षण मुंबई उच्च न्यायालयाने नोंदवले. क्रूझ ड्रग्ज प्रकरणी मुंबई हायकोर्टाने सविस्तर आदेश दिला आहे. आरोपीने हा गुन्हा करण्याची योजना आखली होती, हे स्पष्ट करणारा कोणताही पुरावा नसल्याचे हायकोर्टाने आदेशात म्हटले आहे.

आर्यन खान आणि अरबाज मर्चंट क्रूझवर स्वतंत्रपणे प्रवास करत होते, त्यांनी ड्रग्ज घेण्याची कोणतीही योजना आखल्याचा कोणताही पुरावा नाही. तसेच आर्यन खानच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅटमध्ये आक्षेप घेण्यासारखे काहीही नाही. आर्यन खानकडे कोणतेही ड्रग्ज सापडले नाहीत. अरबाज मर्चंट आणि मुनमुन धमेचाकडे ड्रग्ज सापडले. ते विकण्याजोगे नव्हते. त्यामुळे प्राथमिक तपासात आर्यन, अरबाज मुनमुन यांनी ड्रग्ज विक्रीचे षडयंत्र रचल्याचे दिसून येत नाही, असेही मुंबई उच्च न्यायालयाने म्हटले आहे.