राळेगणसिद्धी (प्रतिनिधी) :  ज्या देशात सरकार लेखी वचन देते व ते वचन पाळत नाही, अशा देशात आता जगण्याची इच्छा राहिलेली नाही,  अशा शब्दांत  ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी आपल्या भावना व्यक्त करून केंद्र सरकारविरोधात नाराजी व्यक्त केली आहे.  

दिल्लीच्या सीमेवर गेल्या २५ दिवसांपासून शेतकऱ्यांनी कृषी कायद्याविरोधात आंदोलन पुकारले  आहे. मात्र, सरकार आपला हटवादीपणा सोडण्यास तयार नाही. तर दुसरीकडे शेतकरीही माघार घेण्यास तयार नाही. यावर अण्णा हजारे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

आयुष्यातील शेवटचे उपोषण आपण दिल्लीतील शेतकऱ्यांसाठी करणार असल्याचे अण्णा हजारेंनी काही दिवसापूर्वी म्हटले होते. त्यानंतर विधानसभेचे माजी सभापती हरिभाऊ बागडे यांच्यासह भाजपच्या काही नेत्यांनी अण्णांच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतली होती.  तसेच अण्णांनी  शेतकऱ्यांसाठी आंदोलन करण्यासाठी दिल्लीत जाऊ नये, अशी विनंती केली होती. परंतु ही विनंती अण्णांनी धुडकावून लावली होती. शेतीमालाला हमीभाव देण्यासंबंधी उच्चाधिकार समिती नेमण्याचे आश्वासन केंद्राने देऊनही ते पाळलेले नाही. त्यामुळे आता आंदोलनाशिवाय पर्याय नसल्याचे अण्णांनी म्हटले आहे.