रांगोळी (प्रतिनिधी) : हुपरी नगरपरिषदेचे भाजपचे उपनगराध्यक्ष भरत लठ्ठे यांना पदावरून हटवण्यासाठी हालचालींना वेग आला होता. अखेर भाजप, ताराराणी आघाडी आणि शिवसेना असे १२ सदस्य एकत्रित येऊन लठ्ठे यांच्याविरुद्ध अविश्वास ठराव दाखल करत असल्याचे पत्र नगराध्यक्षा जयश्री गाट यांना दिले. त्यानुसार २५ ऑक्टोबर रोजी विशेष सभेचे आयोजन करण्यात आले असून सभेकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

लोकलढ्यातून स्थापन झालेल्या नगरपरिषदेच्या पहिल्या निवडणुकीत कोण बाजी मारणार ही उत्सुकता होती. यामध्ये भाजप नगराध्यक्षसह ८, ताराराणी ५, अपक्ष २, मनसे २, शिवसेना २ असे सदस्य निवडून आले. भाजपकडे पुरेसे संख्याबळ असल्याने सत्ता स्थापन केली. ताराराणी आघाडीने नेत्यांच्या आदेशानुसार सत्ताधारी भाजपसोबत राहण्याचा निर्णय घेऊन समजोता एक्स्प्रेसच्या माध्यमातून कारभार सुरू झाला. प्रथम उपनगराध्यक्ष पदी एक वर्षासाठी जयकुमार माळगे यांना संधी मिळाली. त्यांच्या राजीनाम्यानंतर भरत लठ्ठे याना संधी मिळाली.

त्यावेळी उपनगराध्यक्ष व भाजप पक्षप्रतोद अशा दोन्ही जबाबदाऱ्या त्यांच्याकडे होत्या. ठरल्याप्रमाणे कार्यकाळ संपल्यानंतरही लठ्ठे यांनी राजीनामा देण्यास उदासीनता दाखवली. वरिष्ठ नेत्यांनी विनंती करूनही राजीनामा न दिल्याने सदस्य आणि लठ्ठे यांच्यात वादाची ठिणगी पडून दुरावा निर्माण झाला. पक्षप्रतोद पद त्यांच्याकडे असल्याने पुरेसे संख्याबळ असूनही उपनगराध्यक्ष पदावरून हटवण्यासाठी अडचणी निर्माण झाल्या. बहुमताने भाजप पक्षप्रतोद काढून घेऊन रफिक मुल्ला यांची निवड करण्यात आली. लठ्ठे याना पदावरून हटवण्यासाठी कांही दिवसापासून गुप्त हालचाली सुरू होत्या.

अखेर भाजपाचे नेते महावीर गाट आणि ताराराणी आघाडीचे जि. प. सदस्य राहुल आवाडे यांच्या आदेशानुसार भाजप, ताराराणी आघाडी आणि शिवसेना अशी मोठ बांधून १२ सदस्यांनी उपनगराध्यक्ष लठ्ठे यांच्या विरुद्ध अविश्वास ठराव दाखल केला. त्यांच्या मागणीनुसार नगराध्याक्षांनी २५ ऑक्टोबर रोजी विशेष सभा बोलवण्यात आली असून या सभेकडे शहराचे लक्ष लागून राहिले आहे.